PAK vs AUS Test Series Shaheen Afridi: १४ डिसेंबरपासून पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर तीन सामन्यांच्या बहुप्रतिक्षित कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दुसरी आणि तिसरी कसोटी अनुक्रमे मेलबर्न आणि सिडनी येथे खेळवली जाणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज व नवनिर्वाचित कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीने ऑस्ट्रेलियाला आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसाठी ही निरोपाची मालिका असण्याच्या चर्चा आहेत. भारतातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा धावा करणारा सलामीवीर वॉर्नरला पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील सलामीच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले. विशेष म्हणजे, ३७ वर्षीय खेळाडूचे नाव केवळ पर्थ येथील पहिल्या कसोटी सामन्यासाठी आहे.
वॉर्नरच्या पहिल्या कसोटीतील खेळीनुसार, त्याला तिसऱ्या सामन्यासाठी आपले स्थान टिकवून ठेवू शकते. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे कसोटीच्या मालिकेतील तिसरा सामना होणार आहे. पाकिस्तान विरुद्धच्या वॉर्नरच्या निरोपाच्या मालिकेबद्दल बोलताना, वेगवान गोलंदाज आफ्रिदी म्हणाला की पाकिस्तानी संघ वॉर्नरची निरोपाची मालिका खराब करू पाहत आहे.
वॉर्नरसाठी चांगला शेवट होऊ द्यायचा नाही: शाहीन आफ्रिदी
आफ्रिदीने जिओ न्यूजला सांगितले की, “आम्ही त्याला शुभेच्छा देऊ पण डेव्हिड वॉर्नरच्या शेवटच्या कसोटी मालिकेचा शेवट चांगला होईल अशी आम्हाला आशा नाही.” अॅडलेडमध्ये पाकिस्तानविरुद्ध वॉर्नरने झळकावलेल्या शानदार त्रिशतकानंतर, ऑसी सलामीवीराची कसोटी सामन्यांमध्ये सरासरी फक्त २८ आहे.
वॉर्नरने सिडनी येथे कसोटी क्रिकेटला निरोप देण्याबाबत खुलासा केला होता. वॉर्नरने ऑस्ट्रेलियाकडून १०९ कसोटी सामने खेळले आहेत. ४४ पेक्षा जास्त सरासरीने, वॉर्नरने कसोटी क्रिकेटमध्ये ८,४८७ धावा केल्या आहेत. आतापर्यंत वॉर्नरने २५ कसोटी शतके, तीन द्विशतके आणि ३६ अर्धशतके केली आहेत.
हे ही वाचा<< “पाकिस्तानी खेळाडूंवर ट्र्कमध्ये सामान भरण्याची वेळ आली कारण.. “, शाहीन आफ्रिदीने टीकांवर दिलं स्पष्ट उत्तर
दरम्यान, पाहुण्या पाकिस्तानची पहिली कसोटी १४ डिसेंबर रोजी यजमान ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. ही मालिका पाकिस्तानसाठी किती महत्त्वाची आहे याविषयी सांगताना शाहीन आफ्रिदी सांगतो की, “पाकिस्तानसाठी ही एक महत्त्वाची मालिका आहे कारण आम्ही सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलवर आघाडीवर आहोत. आम्हाला कॅनबेराचा फारसा अनुभव नाही, पण मला खात्री आहे, PM XI (पंतप्रधानांनी निवडलेला संघ) चार दिवसीय सामना आम्हाला पर्थमध्ये सुरू होणाऱ्या मालिकेसाठी चांगली तयारी करण्यास मदत करेल.”