Shaheen Afridi’s brilliant bowling video viral: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने शुक्रवारी टी-२० ब्लास्ट स्पर्धेत खेळताना कहर केला. त्याने नॉटिंगहॅमशायरकडून खेळताना वॉर्विकशायरविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकात चार विकेट्स घेतल्या. त्याच्या या कागिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शाहीन आफ्रिदीने दुखापतीतून सावरुन दमदार पुनरागमन केले आहे. त्याने ट्रेंट ब्रिजवरील सामन्यात खराब सुरुवात केली आणि पहिला चेंडू वाईड टाकला. या चेंडूवर ५ धावा गेल्या. यानंतर शानदार पुनरागमन करत त्याने पुढच्या दोन चेंडूत विकेट घेतली. त्यानंतर पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विकेट घेतली. १६९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वॉर्विकशायरी पहिल्या षटकानंतर ४ बाद ७ धावा अशी अवस्था झाली.
टॉम मूरच्या ४३ चेंडूत ७३ धावांच्या शानदार खेळीमुळे विजयासाठी १६९ धावा केल्यानंतर, आफ्रिदीच्या शानदार गोलंदाजीमुळे नॉटिंगहॅमशायरने सामन्यावर ताबा मिळवला, परंतु अखेरीस दोन विकेट्सने पराभव पत्करावा लागला. षटकाच्या पहिल्या चेंडूवर आफ्रिदीने वॉर्विकशायरचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज अॅलेक्स डेव्हिसला (०) बाद केले.
शाहीन आफ्रिदीची दोनदा हॅटट्रिक हुकली –
यानंतर, फलंदाजीला आलेला ख्रिस बेंजामिनने पहिल्या चेंडूवर स्कूप शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण तो चुकला आणि गोल्डन डकवर बाद झाला. ऑली स्टोनच्या अप्रतिम झेलमुळे पाचव्या चेंडूवर डॅन मोस्ली १ धावेवर बाद झाला. शेवटच्या चेंडूवर आफ्रिदीने उत्कृष्ट यॉर्कर मारत एड बर्नार्डला गोल्डन डकवर बाद केले. शाहीनची दोनदा हॅटट्रिक हुकली.
हसन अलीची अप्रतिम गोलंदाजी –
तत्पूर्वी, हसन अलीने वॉर्विकशायरसाठी अप्रतिम गोलंदाजी केली आणि चार षटकांचा शानदार स्पेलही टाकला, ज्यामध्ये त्याने अवघ्या २५ धावांत तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. हसनचे शेवटचे षटक प्रभावी ठरले. शेवटच्या ३ चेंडूत ३ विकेट पडल्या. त्याने दोन विकेट्स घेतल्या आणि एक धावबाद झाला. त्यामुळे नॉटिंगहॅमशायरचा संघ १६८ धावांत गारद झाला.