इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघाचा पराभव झाला आहे. भारताने हा सामना १०० धावांनी गमावला. मात्र या सामन्यामधील पराभव हा फलंदाजीमधील अपयशामुळे झाल्याचं दिसून आलं. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही चमकदार कामगिरी केली. पहिल्या सामन्यामध्ये ६ बळी घेण्याऱ्या जसप्रीत बुमराहने दुसऱ्या सामन्यात दोन गड्यांना बाद केलं.

बुमराहच्या गोलंदाजीबद्दल बोलताना इंग्लंडचा माजी कर्णधार नासीर हुसैनने बुमराह हा सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचं म्हटलंय. अगदी सचिन तेंडुलकरपासून इंग्लंडच्याही अनेक आजी, माजी खेळाडूंनी या वक्तव्याशी सहमती दर्शवली. मात्र असं अशतानाच पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने बुहराहपेक्षा अधिक वेगवान गोलंदाजी शाहीन आफ्रीदी करु शकतो असं विधान केलं आहे.

सलमान भटने पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी हा बुमहारशी तुलना करता येण्यासारख्या उत्तम गोलंदाज असल्याचं म्हटलंय. शाहीन आफ्रिदीच्या कारकिर्दीला नुकतीच सुरुवात झाली असली तरी त्याच्या उपस्थितीमुळे संघाच्या कामगिरीवर झालेला परिणाम हा जाणवण्याइतका आहे असं सलमानने म्हटलं आहे. “शाहीन फार क्रिकेट खेळलेला नाही. मात्र तो सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. तो बुमराहपेक्षा कमी नाही. उलट शाहीन अनुभवाने अधिक उत्तम गोलंदाज होईल. त्याच्याकडे (बुमराहपेक्षा) अधिक वेग असून तो वेगवगेळ्या अंशात गोलंदाजी करु शकतो,” असं सलमानने म्हटलंय.

“दोघेही जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूपैकी आहेत. त्यांना गोलंदाजी करताना पाहणं फार समाधान देणारं आहे. शाहीन आणि बुमराह दोघांनाही मैदानावर पाहण्याचा आनंद वेगळाच आहे. ते नव्या चेंडूने ज्या पद्धतीने गोलंदाजी करता ते पाहून कोणत्याही क्षणी विकेट जाईल असं वाटतं. तुम्हाला इतर कोणत्याही गोलंदाजांना पाहताना असं वाटत नाही,” असं सलमानने युट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटलंय. पहिल्या सामन्यातील कामगिरीच्या जोरावर बुमराह गोलंदाजांच्या जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमाकांवर पोहचला आहे. याच यादीत शाहीन आफ्रिदी तिसऱ्या स्थानी आहे. यादीत न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट दुसऱ्या स्थानी आहे.

Story img Loader