Shaheen Afridi wife Ansha Afridi gave birth to a baby boy : पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि त्याची पत्नी अंशा आफ्रिदी त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करत आहेत. शाहीन शाह आफ्रिदीची पत्नी अंशाने मुलाला जन्म दिला आहे. या जोडप्याने त्यांच्या मुलाचे नाव अली यार ठेवले आहे. आफ्रिदी कुटुंबीयांनी ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली, त्यानंतर जगभरातील चाहते आणि हितचिंतक त्यांचे अभिनंदन करत आहेत. शाहीनचे सासरे आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीसाठीही हा क्षण खास आहे. कारण तो पहिल्यांदाच आजोबा झाला आहे.

बांगलादेशविरुद्धचा पहिला कसोटी सामना संपल्यानंतर डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी उद्या रात्री कराचीला रवाना होणार आहे. यानंतर तो रावळपिंडीतच होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी संघात सामील होईल. शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा आफ्रिदी आणि शाहीन आफ्रिदी यांची २०२१ मध्ये एंगेजमेंट झाली होती. यानंतर त्यांचे लग्न ३ फेब्रुवारी २०२३ रोजी झाले होते. त्यांच्या लग्नासाठी आजी-माजी पाकिस्तान संघाचे खेळाडू देखील उपस्थित होते.

शाहीन आणि अंशाची पहिली भेट कुठे झाली होती?

शाहीन शाह आफ्रिदीची अंशा आफ्रिदीशी पहिली भेट कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये झाली होती. तिथून त्यांच्या संभाषणालाही सुरुवात झाली. जसजसे ते एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू लागले तसतसे त्यांचे नाते अधिक घट्ट होत गेले. प्रदीर्घ कौटुंबिक मैत्रीमुळे शाहीनने अंशाशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर अंशानेही हे नाते पुढे नेण्यास होकार दिला. त्यानंतर घरच्यांच्या संमतीनंतर त्यांचा विवाह झाला.

हेही वाचा – Shikhar Dhawan : दिल्लीत आलिशान घर, कोट्यवधीच्या गाड्या आणि फ्रँचायझी लीगमध्ये संघ; जाणून घ्या गब्बरची एकूण संपत्ती

शाहीन आफ्रिदीची कारकीर्द कशी राहिलीय?

आतापर्यंत शाहीन आफ्रिदीने ३० कसोटी सामन्यांव्यतिरिक्त ५३ एकदिवसीय आणि ७० टी-२९ सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. शाहीन आफ्रिदीच्या नावावर कसोटी फॉरमॅटमध्ये ११३ विकेट्स आहेत. त्याचबरोबर या वेगवान गोलंदाजाने एकदिवसीय सामन्यांमध्ये २३.९४ च्या सरासरीने आणि ५.५४ च्या इकॉनॉमीने १०४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी-२० फॉरमॅटमध्ये शाहीन आफ्रिदीने ७.६६ च्या इकॉनॉमी आणि २०.४ च्या सरासरीने ९६ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आहे.