Pakistan vs South africa 1st T20I Highlights: पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. जिथे दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या स्टार वेगवान गोलंदाजाने एक मोठा पराक्रम केला आहे आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा गोलंदाज ठरला आहे. शाहीन शाह आफ्रिदीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तीन विकेट घेतल्या होत्या. या सामन्यात त्याची गोलंदाजी अप्रतिम होती.
शाहीन शाह आफ्रिदीची ही विक्रमी कामगिरी कमी पडली कारण दक्षिण आफ्रिका संघाने पाकिस्तानवर पहिल्या टी-२०त विजय मिळवला आहे. डेव्हिड मिलरची ८२ धावांची खेळी आणि जॉर्ज लिंडेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर आफ्रिकेने पाकिस्तानवर ११ धावांनी सहज विजय मिळवला. रिझवानची ७४ धावांची उत्कृष्ट खेळीही व्यर्थ ठरली.
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून १८३ धावा केल्या. यादरम्यान शाहीन शाह आफ्रिदीने ४ षटकांत केवळ २२ धावा देत ३ विकेट घेतले. या सामन्यात तिसरी विकेट घेताच त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १०० विकेट पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १०० विकेट घेणारा तो २०वा गोलंदाज ठरला आहे.
शाहीन शाह आफ्रिदीच्या नावावर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० पेक्षा जास्त विकेट्स आहेत. जगातील केवळ तीनच गोलंदाजांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० विकेट्स घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा आफ्रिदी चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी श्रीलंकेचा लसिथ मलिंगा, न्यूझीलंडचा टीम साऊदी आणि बांगलादेशचा शाकिब अल हसन यांनी ही कामगिरी केली आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही या यादीत नाही.
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करून, शाहीन आफ्रिदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानसाठी १०० विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला. शाहीनने आतापर्यंत कसोटीत ११६ विकेट्स घेतल्या आहेत तर एकदिवसीय सामन्यात त्याच्या विकेटची संख्या ११२ आहे.याचबरोबर तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० विकेट्स घेणारा शाहीन आफ्रिदी हा सर्वात तरूण गोलंदाज ठरला आहे.
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये १०० विकेट्स घेणारे गोलंदाज
शाहीन शाह आफ्रिदी – २४ वर्षे, २४८ दिवस
टीम साऊदी – ३२ वर्षे, ३१९ दिवस
शाकिब अल हसन – ३४ वर्षे, ३१९ दिवस
लसिथ मलिंगा – ३६ वर्षे, ९ दिवस