Shaheen Shah Afridi and Shan Masood video viral during PAK vs BAN 1st Test : पाकिस्तान संघाला बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत दारुण पराभव पत्करावा. या पराभवानंतर पाकिस्तानची क्रिकेट विश्वात फजिती झाली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट संघात सर्व काही सुरळीत चालले नाही आणि खेळाडूंमध्ये फूट पडल्याच्या चर्चा रंगत आहेत. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी, कर्णधार शान मसूद मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पीशी वाद घालताना दिसला. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे सामन्याच्या पाचव्या दिवशी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शाहीन शाह आफ्रिदी कर्णधार शान मसूद यांच्यात सर्व काही ठीक नसल्याचे दिसत आहे.
वास्तविक, सामन्यादरम्यान पाकिस्ता संघाचे खेळाडू एकत्र जमल्यानंतर कर्णधार मसूदने आफ्रिदीच्या खांद्यावर हात ठेवला होता. त्यानंतर सर्व खेळाडू येऊ लागले आणि आफ्रिदीने मसूदचा हात आपल्या खांद्यावरून झटकला. आता घटनेचाा व्हिडिओही समोर आला आणि चाहत्यांचा अंदाज आहे की संघात सर्व काही ठीक नाही. यापूर्वी शाहीन आफ्रिदी आणि बाबर आझम यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. टी-२० विश्वचषकात पाकिस्तान पहिल्या फेरीतून बाहेर पडण्याचे मुख्य कारण आफ्रिदी, बाबर आणि रिझवान यांच्यातील मतभेद असल्याचे मानले जात होते.
शाहीन आफ्रिदी आणि शान मसूदचा व्हिडीओ व्हायरल –
आता मसूद आणि शाहीन यांच्यातील मतभेदामुळे चाहत्यांसाठी आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत. याआधी कर्णधार शान मसूदही प्रशिक्षक जेसन गिलेस्पीसोबत जोरदार वाद घालताना दिसला होता. ज्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. पाकिस्तानला प्रथमच बांगादेशविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे डब्ल्यूटीसी गुणतालिकेतही फटका बसला आहे. या पराभवामुळे पाकिस्तान संघाचे नुकसान झाले आहे. संघाची सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्याच्या खात्यात २२ गुण आहेत आणि विजयाची टक्केवारी ३०.५६ आहे.
बांगलादेशचा कसोटी क्रिकेट इतिहासातील पाकिस्तानविरुद्ध पहिला विजय –
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाने ६ बाद ४४८ धावांवर डाव घोषित केला. यादरम्यान पाकिस्तानकडून सौद शकीलने १४१ आणि मोहम्मद रिझवानने १७१ धावा केल्या. यानंतर बांगलादेश संघ प्रत्युत्तरात ५६५ धावांवर गारद झाला. यासह बांगलादेशने पहिल्या डावात ११७ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानला १४६ धावांवर गुंडाळले. ज्यामुळे बांगलादेशला केवळ विजयासाठी ३० धावांचे लक्ष्य मिळाले. ज्याचा पाठलाग बांगलादेशने ६.३ षटकात एकही विकेट न गमावता केला.