Legends League Cricket 2023 Viral Video : लिजेंड्स लीग क्रिकेट मास्टर्समध्ये एशिय लायन्स संघाने इंडिया महाराजा संघाचा ९ धावांनी पराभव केला. त्यानंतर विजेत्या संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने संघासोबत खास स्टाईलमध्ये विजयाचा जल्लोष केला. पण आफ्रिदीची एक व्हिडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर एकच हशा पिकला आहे. कारण सामना संपल्यानंतर आफ्रिदी हरभजन सिंगच्या जवळ गेला आणि त्याला गळाभेट दिली. पण बाजूलाच असलेल्या एका महिला पंचाला खेळाडू समजून शाहिद आफ्रिदी गळाभेट द्यायला गेला. काही क्षणातच आफ्रिदीला आपल्या बाजूला महिला पंच उभ्या असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर त्याने महिला पंचांना हात मिळवला. हा संपूर्ण हास्यास्पद प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
लिजेंड्स लीग क्रिकेटच्या सुरुवातीच्या सामन्यात एशिया लायन्सने विजय मिळवला. पाकिस्तानचा माजी खेळाडू मिसबाह उल हकने आक्रमक खेळी केली. श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू तिलकरत्ने दिलशान आणि असघर अफघान यांनी इनिंगच्या सुरुवातीलाच विकेट गमावल्या. त्यामुळे एशिया लायन्सच्या फलंदाजांना सुरुवातीच्या षटकांमध्ये सावध खेळी करावी लागली. परंतु, श्रीलंकेचा माजी खेळाडू उपूल थरंगाने ३९ चेंडूत ४० धावांची खेळी साकारली. तर मिसबाहने चौफेर फटकेबाजी करून मॅच विनिंग धावसंख्या फलकावर लावली.
इथे पाहा व्हिडीओ
मिसबाह उल हकची चौफेर फटकेबाजी
४८ वर्षांच्या मिसबाहने ५० चेंडूत ७३ धावा कुटल्या. त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर एशिया लायन्सने २० षटकांत १६५ धावांपर्यंत मजल मारली. नंबर पाचवर फलंदाजी करायला आलेल्या शाहिद आफ्रिदीला धावांचा सूर गवसला नाही. इंडिया महाराजा संघाचे गोलंदाज स्टुअर्ट बिनी आणि परविंदर अवाना यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. इंडिया महाराचा संघाचा कर्णधार गौतम गंभीरलाही चमकदार कामगिरी करता आली नाही. साऊथपॉने ३९ चेंडूत ५४ धावा केल्या. तर मुरली विजयने १९ चेंडूत २५ धावा केल्या. सुरेश रैना आणि युसुफ पठाण यांनाही धावांचा सूर न गवस्याने संघाला पराभवाचा सामना करावा लागला.