Asia Cup, Shahid Afridi Blames India: बीसीसीआय (BCCI) यावर्षी आशिया चषकाचे सामने ‘हायब्रीड’ मॉडेलने खेळले जावे यासाठी प्रयत्न करेल असे वृत्त गुरुवारी समोर आले होते. याचा अर्थ असा की, भारताचे सामने पाकिस्तानात नव्हे तर एखाद्या तटस्थ ठिकाणी होतील तर उर्वरित स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान करू शकते. जर दोन देश अंतिम फेरीसाठी पात्र ठरले तर अंतिम सामना सुद्धा तटस्थ ठिकाणी खेळवला जाईल. या चर्चांवरून क्रिकेट विश्वात थोडे तापलेले वातावरण पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंनी भारत हरण्याच्या भीतीने पाकिस्तानात येण्यास तयार नाही अशीही भाकितं केली आहेत. दरम्यान पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने भारताच्या भूमिकेवरून जहरी टीका केली आहे. इतकेच नाही तर त्याच्या कार्यकाळातील एक अनुभव सांगत भारतावर आरोपही लगावले आहेत.
आशिया चषकासाठी दोन्ही देशांच्या भूमिकेबद्दल आफ्रिदीला विचारण्यात आले. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने सांगितले की, “पाकिस्तानमध्ये सुरक्षेचा प्रश्न असेल तर तो केवळ भारतालाच का? आंतरराष्ट्रीय संघांनी आमच्या देशात भेट दिली आहे. ते खेळाडू आनंद घेत आहेत. आम्हाला सुद्धा भारताकडून धमक्या येत होत्या, पण जेव्हा जेव्हा बोर्ड आणि सरकार एकाच निर्णयावर असतात तेव्हा दौरा थांबवला जात नाही. भारतात जाण्यास आम्ही कधीच नकार दिला नाही. आणि जर आता त्यांनी तसे केले नाही तर, ज्यांना द्वेष पसरवायचा आहे असा अर्थ निघतो.”
आफ्रिदी म्हणतो, “भारताकडून अपेक्षा नव्हती की…”
स्पोर्ट्स यारीशी बोलताना आफ्रिदीने पुढे सांगितले की, मी ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन देशांमध्ये क्रिकेटचा सर्वाधिक आनंद घेतला आहे. भारतात मला जे प्रेम मिळालं, त्याची अपेक्षा कधीच नव्हती. आम्हाला भारतात खेळायचे आहे, इथेही गर्दीत अनेक भारतीय आहेत, ते भेटतात, ऑटोग्राफ घेतात. क्रिकेट ही सर्वोत्तम डिप्लोमसी आहे. पाकिस्तान आणि भारताचे संबंध चांगले असावेत आणि त्यांची ताकद वाढावी, अशी माझी मनापासून इच्छा आहे,”
दरम्यान, यंदाची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. पाकिस्तानकडे यंदाचं या स्पर्धेचं यजमानपद देण्यात आलं आहे. परंतु भारताने या स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेचा कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानला पाठवू शकत नाही, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.