Shahid Afridi Trolled: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेने पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये सुमारे २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका स्वीकारली आहे. याचाच भाग म्हणून भारताने सिंधू पाणी कररा आणि पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताच्या या निर्णयानंतर पाकिस्तानातून अनेकजणांनी भारताविरोधात गरळ ओकायला सुरुवात केली आहे. यामध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याचाही समावेश आहे. भारताने पाकिस्तान विरोधात केलेल्या राजनैतिक कारावाईनंतर शाहिद आफ्रिदीने भारतीय लष्कराबाबत अनेक उलट सुलट विधाने केली आहेत.

दरम्यान आफ्रिदीने भारतावर आणि भारतीय लष्करावर केलेल्या टीकेनंतर सोशल मीडियावर भारतीय नागरिकांनीही त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले आहे.

दरम्यान शाहिद आफ्रिदीने भारतावर केलेल्या टीकेचे व्हिडिओ व्हायरल होताच, सोशल मीडियावर अनेकांनी, शाहिद आफ्रिदीला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. यामध्ये काही जणांनी त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले आहे.

एकाने आफ्रिदीच्या प्रतिक्रियेवर कमेंट्स करत, “तो वाईट खेळाडू असला तरी त्याने क्रिकेटमध्येच राहावे”, असे म्हटले आहे. आफ्रिदीला ट्रोल करणाऱ्या दुसऱ्या युजरने त्याला प्रश्न केला की, “त्याने नवीन टीव्ही घेतला आहे की नाही.”

यावेळी आणखी एका भारतीय युजरने गमतीशीर प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, “आफ्रिदीला क्रिकेटच्या मैदानावरील खेळपट्टीही नीट समजत नाही, आता त्याला लष्करी कारवाया समजून घ्यायच्या? विश्वचषकात भारताकडून पराभूत होण्याचा विक्रम कायम ठेवा.”

शाहिद आफ्रिदीने पहलगाम हल्ल्याबाबत दिलेल्या बेताल विधानावर असदुद्दीन ओवैसी यांनी तीव्र हल्ला चढवला आहे. एआयएमआयएम प्रमुख ओवैसी यांनी आफ्रिदीवर टीका केली आणि त्याचा जोकर म्हणून उल्लेख केला. जेव्हा एका पत्रकाराने ओवेसींना शाहिद आफ्रिदीबद्दल प्रश्न विचारला तेव्हा ओवेसी म्हणाले, “तो कोण आहे? हा एक नाटक आहे. तुम्ही माझ्यासमोर जोकरचे नाव का घेत आहात?”