Shahid Afridi criticized Najam Sethi’s frequently changing stance: आशिया चषक स्पर्धेच्या यजमानपदाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ही स्पर्धा पाकिस्तानात झाल्यास टीम इंडियाला पाठवण्यास बीसीसीआयने नकार दिला आहे. तेव्हापासून ही स्पर्धा कुठे होणार याबाबत विविध चर्चा समोर येत आहेत. विशेषत: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी कधी हायब्रीड मॉडेलचा तर कधी आशिया कप इंग्लंडमध्ये आयोजित करण्याची वकिली केली आहे.
आशिया चषक स्पर्धेच्या आयोजनाबाबत वारंवार केलेल्या वक्तव्यामुळे शाहिद आफ्रिदीने पीसीबी अध्यक्ष नजम सेठी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यासोबतच आफ्रिदीने आणखी एक मोठी गोष्ट सांगितली आहे. आफ्रिदीच्या मते, विश्वचषकात सहभागी होण्यासाठी पाकिस्तान संघाला भारतात जाणे आवश्यक आहे.
शाहिद आफ्रिदी समा टीव्हीवरील एका कार्यक्रमात म्हणाला, “नजम सेठी यांनी हे समजून घेतले पाहिजे की, पीसीबी अध्यक्षपदाची खुर्ची खूप मोठी आहे. तसेच त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच त्यांनी आपली भूमिका वारंवार बदलू नये. आशिया चषकाबाबत ते वारंवार आपली विधाने बदलत आहेत. कधी म्हणतायेत येथे करा, तर कधी तिकडे. आता म्हणतायेत आशिया चषक इंग्लंडमध्ये आयोजित करा. त्यांच्या या गोष्टी माझ्या पचनी पडत नाहीत. त्यांना सर्वत्र मुलाखती देण्याची गरज नाही.”
हेही वाचा – IPL 2023: कर्णधार हार्दिक पांड्याची विमानात स्वॅगवाली एन्ट्री, गुजरात टायटन्सने शेअर केला मजेदार VIDEO
आफ्रिदीने नजम सेठीला फटकारले –
आफ्रिदीने पीसीबी चेअरमन नजम सेठी यांच्यावर त्यांच्या वयावरून निशाणा साधला आहे. तो म्हणाला की, “अध्यक्ष असा माणूस असावा, ज्याचा हेतू स्पष्ट असेल आणि जो कोणत्याही विषयावर आपली भूमिका ठाम ठेवेल.” तो पुढे म्हणाला की, “पीसीबीचे अध्यक्ष वारंवार सांगत आहेत की, पाकिस्तानचा संघ विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाणार नाही. मला ही गोष्ट समजत नाही. अहो, क्रिकेट होत आहे. आम्ही आमची टीम पाठवून त्यांना स्पष्ट सांगायला हवं की, भारतात जाऊन वर्ल्ड कप खेळा आणि जिंकून ट्रॉफी घेऊन या. संपूर्ण देश तुमच्या मागे उभा आहे. भारतात जाऊन विश्वचषक जिंकणे यापेक्षा मोठे काय असेल, ही एक प्रकारची टापटच म्हणावी लागेल.”
बीसीसीआयची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट आहे की, जर आशिया कप पाकिस्तानमध्ये झाला, तर टीम इंडिया तिथे खेळायला जाणार नाही. त्यामुळेच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी तटस्थ ठिकाणी स्पर्धेबाबत बोलले आहे. पण, पीसीबी ही स्पर्धा पाकिस्तानातच आयोजित करण्यावर ठाम आहे.
काही साध्य होत नसल्याचे पाहून त्यांनी हायब्रीड मॉडेलची वकिली केली. याअंतर्गत भारताचे सामने पाकिस्तानऐवजी दुबई किंवा अन्यत्र खेळवण्याचा फॉर्म्युला देण्यात आला होता. पण, गेल्या आठवड्यात पीसीबी अध्यक्षांनी आशिया चषक इंग्लंडमध्ये आयोजित करण्याची सूचना केली. त्यांच्या सूचनेला पाकिस्तानातच विरोध होत आहे.