पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी अनेकदा क्रिकेटमधून संन्यास घेऊनही पुन्हा मैदानावर परतला होता. मात्र गुरुवारी आफ्रिदीने आपल्या आयुष्यातील अखेरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला. निमित्त होते ते हरिकेन वादळात उध्द्वस्त झालेल्या स्टेडियमची मदत म्हणून खेळण्यात आलेल्या प्रदर्शनीय सामन्याचे. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने वर्ल्ड इलेव्हनला ७२ धावांनी पराभूत केले.
हरिकेन इर्मा आणि मारिया या वादळामुळे कॅरेबियन बेटांवर पाच स्टेडियमचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे स्टेडियमची डागडुजी करण्याच्या उद्देशाने हा प्रदर्शनीय सामना खेळण्यात आला. या सामन्यात आफ्रिदीने वर्ल्ड इलेव्हन संघाचे कर्णधारपद भूषवले. याशिवाय १ बळी टिपला आणि ११ धावा केल्या. फलंदाजीत त्याला ठसा उमटवता आले नाही. पण या सामन्याच्या निमित्ताने आफ्रिदीमधील एक दिलदार माणूस दिसून आला.
या सामान्याच्या निमित्ताने आफ्रिदीने २० हजार डॉलर्स मदत केली. ‘होप नॉट आऊट’ या त्याच्या फाऊंडेशनच्या नावांने त्याने हा निधी दिला. सुमारे १३ लाख ४९ हजार ३०० रुपयांची मदत त्याने केली. याबाबत आफ्रिदीने एकल ट्विटही केले. मला क्रिकेटसाठी मदतनिधी उभारण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयसीसीचा आभारी आहे. हा माझ्यासाठी भाग्याचा आणि गर्वाचा क्षण होता. मी माझ्या फाऊंडेशनच्या वतीने या वादळग्रस्तांना २० हझर डॉलर्सची मदत करत आहे, असे आफ्रिदीने ट्विट केले.
Thank you ICC for providing me the opportunity of contributing to #CricketRelief cause. It was a real honour for me and a memory I’ll cherish for long. On behalf of my Foundation I’m making a donation 20000$ for the Hurricane victims in Caribbean. #HopeNotOut
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) May 31, 2018
या सामन्यात आफ्रिदीने आपला हा शेवटचा सामना असल्याचेही मान्य केले.