Shahid Afridi Criticizes Zaka Ashraf: एकीकडे पाकिस्तान क्रिकेट संघ २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतील कठीण टप्प्यातून जात असताना, दुसरीकडे संघाच्या व्यवस्थापनालाही अडचणीचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख झका अश्रफ यांनी अलीकडेच संघाचा कर्णधार बाबर आझमबद्दल बरेच काही बोलले आणि लाइव्ह शोमध्ये बाबर आझमचे व्हॉट्सअॅप चॅटही लीक केले होते. या संदर्भात आता संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने झका अश्रफवर जोरदार हल्ला चढवला. तसेच त्यांना आपल्या कामाशी काम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शाहिद आफ्रिदी झका अश्रफवर संतापला –

विश्वचषक २०२३ च्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव केला. यादरम्यान शाहिद आफ्रिदी एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये बोलत होता. दरम्यान, त्याला झका अश्रफ आणि बाबर आझम यांच्यातील वादाबद्दल विचारण्यात आले तेव्हा आफ्रिदीने संतप्तपणे उत्तर दिले की, “झका अश्रफ हे कोणताही क्लब चालवत नसून ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख आहेत. त्यांनी अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही मीडिया हाऊसच्या मालकांना फोन करून सांगत आहात की कोणीतरी तुमच्याबद्दल काहीतरी बोलत आहे. तुम्ही तुमच्या कामाशी काम ठेवा, आपले काम करा. तुमच्याकडून जे अपेक्षित आहे ते पूर्ण करा.”

पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर –

या विश्वचषकात पाकिस्तान संघाने चांगली सुरुवात केली होती, पण त्यांना आपल्या कामगिरीत सातत्य ठेवता आले नाही. सलग चार सामने गमावल्यानंतर पाकिस्तानने बांगलादेशविरुद्ध स्पर्धेतील तिसरा विजय संपादन केला. पाकिस्तानची उपांत्य फेरी गाठण्याची शक्यता फारच कमी असली तरी संघाने अद्याप आशा सोडलेली नाही. सध्या पाकिस्तान संघ ७ पैकी ३ सामने जिंकून ६ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे.

हेही वाचा – SMAT: सेहवाग-बटलरला मागे टाकत रियान परागने रचला इतिहास, टी-२० क्रिकेटमध्ये ‘हा’ विश्वविक्रम करणारा ठरला पहिलाच फलंदाज

पाकिस्तान उपांत्य फेरीत कसा प्रवेश करेल?

बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तान ६ गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे, पाकिस्तान संघाला आपले पुढील सामने न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहेत. उपांत्य फेरी गाठण्यासाठी पाकिस्तानला हे दोन्ही सामने कोणत्याही किंमतीत जिंकावे लागतील, त्याशिवाय संघाला चांगल्या धावगतीवरही लक्ष केंद्रित करावे लागेल. मात्र, हे समीकरण पाकिस्तानसाठी पुरेसे नाही. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे संघ आगामी सामने हरले तरच पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचे दरवाजे उघडू शकतात. याशिवाय अफगाणिस्तानचा संघ आपले उर्वरित तीन सामने जिंकू नये, अशी प्रार्थनाही पाकिस्तानला करावी लागणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid afridi has advised pcb chief zaka ashraf to mind his own business vbm