शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले आणखी एक पुनरागमन संस्मरणीय ठरवले. त्यामुळेच गयाना राष्ट्रीय स्टेडियमवरील पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजवर १२६ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेत पाकिस्तानचा संघ अपयशी ठरला होता. आफ्रिदीला या संघातून वगळण्यात आले होते. परंतु कॅरेबियन दौऱ्यावर तो आपल्या ‘बूम बूम आफ्रिदी’ या दिमाखदार शैलीमध्ये परतला. अष्टपैलू आफ्रिदीने एकदिवसीय क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजीची कामगिरी नोंदवली. त्याने ९-३-१२-७ असे त्याचे प्रभावी पृथक्करण होते. त्यामुळे घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजचा संघ फक्त ४१ षटकांमध्ये ९८ धावांवर गारद झाला. त्याआधी पाकिस्तानने ९ बाद २२४ अशी धावसंख्या उभारली तीसुद्धा आफ्रिदीच्या दमदार फटकेबाजीच्या बळावर. ५५ चेंडूंत ६ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने आफ्रिदीने आपली ७६ धावांची दणदणीत खेळी साकारली. पाकिस्तानची ५ बाद ४७ अशी केविलवाणी अवस्था झाली असताना आफ्रिदी मैदानावर समर्थपणे उभा राहिला. त्याने कर्णधार मिसबाह-उल-हक (५२) याच्यासोबत सहाव्या विकेटसाठी १२० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. वेस्ट इंडिजच्या जेसॉन होल्डरने १३ धावांत ४ बळी घेतले.
‘‘मी मेहनतीने संघात परतलो आहे. फक्त संघात स्थान टिकवणे एवढेच उद्दिष्ट मी समोर ठेवलेले नाही, तर संघासाठी मी सर्वतोपरी सज्ज आहे,’’ असे आफ्रिदीने सांगितले. आपल्या १७ वर्षांच्या कारकीर्दीमधील आफ्रिदीची आणखी एक अदाकारी क्रिकेटरसिकांना या निमित्ताने पाहायला मिळाली.
गोलंदाजी : ९-३-१२-७
फलंदाजी : चेंडू ५५, चौकार ६, षटकार ५, धावा ७६
आफ्रिदीचे संस्मरणीय पुनरागमन
शाहिद आफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले आणखी एक पुनरागमन संस्मरणीय ठरवले. त्यामुळेच गयाना राष्ट्रीय स्टेडियमवरील पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजवर १२६ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
First published on: 15-07-2013 at 06:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid afridi returns with the bang