भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेटच्या मैदानातील वैर जगजाहीर आहे. दोन्ही संघातील खेळाडू आतापर्यंत अनेकदा मैदानावर भिडताना दिसले आहेत. काही माजी खेळाडू तर अजूनही सोशल मीडियावर एकमेकांचा पाणउतारा करताना दिसतात. असे असले तरी, काही पाकिस्तानी खेळाडूंना भारतीय क्रिकेटच्या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेची आणि विस्ताराची पुरेपुर जाणीव आहे. माजी पाकिस्तानी खेळाडू आणि कर्णधार शाहिद आफ्रिदीने नुकतेच भारतीय क्रिकेटबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आफ्रिदीने नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग आणि त्याच्या कालावधीबद्दल आपले मत मांडले. शाहिद आफ्रिदीच्या म्हणण्यानुसार, ‘जागतिक क्रिकेटवर भारताचा मोठा प्रभाव आहे. कारण, हा देश खेळासाठी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. अडीच महिने चालणाऱ्या आयपीएलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर तसेच पाकिस्तानच्या भविष्यातील क्रिकेट दौऱ्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो’.

हेही वाचा – ENG vs IND: भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर करोनाचे संकट! ‘या’ खेळाडूला झाली लागण

गेल्या आठवड्यात पुढील पाच वर्षांसाठी आयपीएलचे प्रसारण हक्क विकण्यात आले. या लिलावातून भारतीय क्रिकेट नियमाक मंडळाला (बीसीसीआय) जवळपास ६.२ बिलियन डॉलर्सची कमाई झाली. यामुळे आयपीएल ही क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत लीग स्पर्धा बनली आहे. याशिवाय, बीसीसीआयने पुढील वर्षापासून स्पर्धेचा कालावधीही वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व गोष्टींचा जागतिक क्रिकेटवर आणि इतर देशांच्या वेळापत्रकांवर नक्कीच परिणाम होणार, असे आफ्रिदीचे म्हणणे आहे.

‘एका लीगसाठी एवढी मोठी कालमर्यादा राखून ठेवण्याइतपत भारताचे जागतिक क्रिकेटवर वर्चस्व आहे. हा सर्व खेळ बाजार आणि अर्थव्यवस्थेवर अवलंबून आहे. सध्या भारत ही क्रिकेटची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये ते जे म्हणतील तिच पूर्वदिशा ठरते’, असे शाहिद आफ्रिदी म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahid afridi said india has a big influence on world cricket vkk