Shahid Afridi’s Statement About Team India: जेव्हा टीम इंडिया वर्ल्ड कप २०२३ च्या अंतिम सामन्यात फलंदाजी करत होती, तेव्हा पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने लाइव्ह टीव्हीवर एक विधान केले होते. तो भारतीय फलंदाजांबद्दल म्हणाला होता की, कधी कधी अतिआत्मविश्वास तुम्हाला महागात पडतो. फायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या या माजी क्रिकेटरचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
शाहीद आफ्रिदीने पाकिस्तानी वृत्तवाहिनी ‘समा टीव्ही’वरील चर्चेदरम्यान हे वक्तव्य केले होते. येथे त्याच्यासोबत मोहम्मद युसूफही पॅनेलमध्ये उपस्थित होता. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पहिल्या पॉवरप्लेमध्ये भारतीय डाव अडचणीत असताना आफ्रिदीने भारतीय फलंदाजांवर निशाणा साधला होता. शाहिद आफ्रिदीचे हे विधान शुबमन गिल निष्काळजीपणे फटकेबाजीवर आणि रोहित शर्मा अनावश्यक शॉटवर बाद झाल्यानंतर आले होते.
सतत जिंकल्याने अतिआत्मविश्वास वाढतो –
सामन्याच्या ११व्या षटकात श्रेयस अय्यरच्या रूपाने टीम इंडियाने तिसरी विकेट गमावली, तेव्हा अँकरने शाहिद आफ्रिदीला विचारले की, हे एखाद्या मोठ्या सामन्याचे दडपण आहे का? यावर आफ्रिदी म्हणाला, “नाही, हे मोठ्या सामन्याचे दडपण नाही. त्यांच्यात आत्मविश्वास आहे. ते असेच वाढले आहेत. एवढ्या प्रेक्षकांसमोर खेळत आले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट हे पूर्णपणे दबावावर आधारित असते. हे त्यांना माहीत आहे. जेव्हा तुम्ही सतत सामने जिंकत असता, तेव्हा तुमचा अतिआत्मविश्वास वाढतो आणि ही गोष्ट तुम्हाला महागात पडते. कारण ज्या चेंडूंवर तो बाद झाला, तो चेंडू विकेट टाकण्यासारखा नव्हता.”
विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा ६ विकेट्सनी पराभव –
विश्वचषकाच्या फायनलमध्ये पहिले तीन विकेट लवकर गमावल्याने टीम इंडिया दडपणाखाली दिसली. पहिल्या पॉवरप्लेनंतर विराट कोहली आणि केएल राहुलने अतिशय संथ भागीदारीत धावा केल्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाजही ठराविक अंतराने विकेट घेत होते. याचा परिणाम असा झाला की भारतीय संघ अवघ्या २४० धावांवर गारद झाला. यानंतर प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने लक्ष्याचा ४३ षटकांत सहज पाठलाग केला आणि ६ गडी राखून सामना जिंकला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली.