Shahid Afridi Furious With Shaheen and Babar: आशिया चषक २०२३ च्या सुपर फोर सामन्यात पाकिस्तानला भारताविरुद्ध २२८ धावांनी लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर पाकिस्तानसाठी अंतिम फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. आता जेतेपदाच्या लढतीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला गुरुवारी श्रीलंकेविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल. त्याचवेळी श्रीलंकेने जिंकल्यास भारत आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना खेळवला जाईल.
भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा मुख्य वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी चांगलाच महागात पडला. त्याने ७९ धावा दिल्या आणि एकच यश मिळविले. टीम इंडियाविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने आपल्या जावयावर म्हणजेच शाहीनवर जोरदार संताप व्यक्त केला आहे.
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानी संघाच्या गोलंदाजीवर जोरदार टीका –
शाहिद आफ्रिदीने सांगितले की, शाहीनला त्याच्या लाइन आणि लेंथवर सातत्य राखावे लागेल. भारताने दिलेल्या ३५७ धावांच्या लक्ष्यासमोर पाकिस्तानचा संघ ३२ षटकांत ८ बाद १२८ धावाच करू शकला. कारण नसीम शाह आणि हरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजीला आले नाहीत.
एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानी संघाच्या गोलंदाजीवर जोरदार टीका केली.
तुम्ही अशी कारण कारणं देऊ शकत नाहीत –
शाहिदने शाहीन आफ्रिदीच्या कामगिरीवरही टीका केली, जो त्याचा जावई आहे. तो म्हणाला, “जर तुम्ही पहिल्या दोन षटकात विकेट घेऊ शकत नसाल, तर तुम्ही स्वतःवर रागावू शकत नाही. तुम्ही अशी कारण कारणं देऊ शकत नाहीत. खेळपट्टी चांगली असली तरी गोलंदाजी चांगली नव्हती. नसीमच्या लाइन आणि लेन्थवर शाहीनने गोलंदाजी का केली नाही?”
बाबर आझमवरही भडकला शाहिद आफ्रिदी –
माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याच्या कर्णधार बाबर आझमच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. माजी अष्टपैलू खेळाडू म्हणाला, “जर आम्ही योग्य गोलंदाजी केली असती, जसे नसीमने डावाच्या सुरुवातीला गोलंदाजी केली असती, तर परिस्थिती वेगळी असती. शाहीनने नसीमप्रमाणे गोलंदाजी करायला हवी होती, पण त्याची लाईन आणि लेन्थ बरोबर नव्हती. माझ्या मते भारताने २०-२५ षटकांनंतर सामना जिंकला.”