माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या करोना संसर्गामुळे रुग्णालयात उपचार घेत आहे. करोनाची लागण झाल्यानंतर तो घरी क्वारंटाइन होता. मात्र, सचिनने ट्विट करुन आपल्या रुग्णालयात दाखल होण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. त्यानंतर तो बरा व्हावा यासाठी जगभरातील चाहत्यांनी प्रार्थना केली आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमनेही त्याच्यासाठी खास संदेश दिला होता. आता आणखी एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने सचिन लवकर बरा होण्यासाठी एक ट्विट केले आहे.
वसीम अक्रमनंतर पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनेही सचिन तेंडुलकरला बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आफ्रिदी ट्विटवरवर म्हणाला, ”लेजेंड तुला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. तू दमदार पुनरागमन करशील यात वाद नाही. तुला अल्पावधीतच रुग्णालयात रहावे लागेल, कारण तू लवकरच बरा होऊ शकतोस.”
Wishing you a speedy recovery Legend . No doubt that you will make a strong recovery.
May your hospital stay be short and your recovery even shorter! https://t.co/JfYhJeBTre— Shahid Afridi (@SAfridiOfficial) April 2, 2021
आफ्रिदीपूर्वी पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमनेही त्याच्यासाठी खास संदेश दिला होता. अक्रम ट्विटरवर म्हणाला, ”16 वर्षाचा असताना तू जगातील सर्वोत्तम गोलंदाजांचा धैर्याने सामना केलास. मला खात्री आहे की, करोनालाही तू षटकार ठोकशील. लवकर बरा हो मास्टर! 2011च्या विश्वविजेत्या दशकपूर्तीचा आनंद डॉक्टर आणि रुग्णालयाच्या कर्मचार्यांसह साजरा केला, तर ते खूप चांगले होईल. मला फोटो पाठव.”
रस्ते सुरक्षा जागतिक मालिका क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या सचिनसह भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण, त्याचा मोठा भाऊ युसूफ, एस. बद्रिनाथ यांना करोनाची लागण झाली आहे. रायपूरला झालेल्या स्पर्धेत सचिनच्या नेतृत्वाखालील इंडिया लेजेंड्स संघाने जेतेपद पटकावले होते.
सचिनची कारकीर्द
200 कसोटी सामने खेळणारा आणि 100 आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारा सचिन जगातील एकमेव फलंदाज आहे. त्याने कसोटी सामन्यात 53.78च्या सरासरीने आणि 51 शतकांसह 15 हजार 921 धावा केल्या. तर 463 एकदिवसीय सामन्यामध्ये 44.83च्या सरासरीने 18 हजार 426 धावा बनवल्या. यामध्ये त्याने 49 शतके आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे. सचिनने 2013मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.