अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव करून भारताने पाचव्यांदा विजेतेपद पटकावले. व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर भारताने हा विजय मिळवला. या सामन्यात अष्टपैलू राज बावाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याने प्रथम इंग्लंडच्या पाच विकेट घेतल्या आणि नंतर फलंदाजीत ३५ धावांची उपयुक्त खेळी खेळली. भारताच्या विजयानंतर अनेकांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले. त्यात बॉलिवूड स्टार शाहिद कपूरचाही समावेश होता. शाहिद कपूरने भारतीय संघाचे विशेष अभिनंदन केले असले, तरी त्याने मोठी चूक केली. या चुकीमुळे शाहिदला खूप ट्रोल केले जात आहे.
यश धुलच्या भारतीय अंडर-१९ संघाचे अभिनंदन करताना, शाहिदने २०१८च्या संघाचा एक फोटो शेअर केला. त्याने पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखालील संघाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत पृथ्वी शॉ, शुबमन गिल, कमलेश नागरकोटी आणि शिवम मावी हे खेळाडू दिसत आहेत. शाहिदने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा चुकीचा फोटो शेअर केला आहे. शाहिदने तो फोटो हटवला असला, तरी तोपर्यंत त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते.
हेही वाचा – ‘‘आता DRS म्हणजे धोनी रिव्ह्यू सिस्टम नव्हे, तर…”, गावसकरांनी सुचवलं नवं नाव!
या महाअंतिम सामन्यात भारतासमोर १९० धावांचे लक्ष्य होते. सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी डावाच्या दुसऱ्या चेंडूवर बाद झाला. यानंतर हरनूर सिंग आणि शेख रशीद यांनी ४९ धावा जोडून संघाला पुन्हा सामन्यात आणले. त्यानंतर रशीदने कर्णधार यश धुलच्या साथीने भारतीय संघाला अडचणीत येण्यापासून वाचवले. मात्र, इंग्लंडने सलग विकेट घेत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण मधल्या फळीत राज बावा आणि निशांत सिंधू (नाबाद ५०) यांनी पाचव्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी करत भारताला विजयाच्या जवळ नेले. शेवटी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश बाणाने सलग षटकार मारून सामना संपवला.