Pakistan squad announced for Asia Cup 2023: कोणत्याही स्पर्धेसाठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ जाहीर झाला की कुठेही गदारोळ किंवा वाद झाला नाही, असे क्वचितच पाहायला व ऐकायला मिळते. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया कप २०२३ आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पाकिस्तान संघाची घोषणा केली होती. या संघातून शान मसूद, इशानउल्लाला आणि अष्टपैलू इमाद वसीमलाही वगळण्यात आले. इमर्जिंग आशिया कपमध्ये भारत-अ संघाविरुद्ध शतक झळकावणाऱ्या तैयब ताहिरला संघात स्थान देण्यात आले.
वेगवान गोलंदाज शाहनवाज दहानीलाही या संघात संधी मिळाली नाही, त्यामुळे तो संतप्त झाला आणि त्याने संघ निवडीबाबत पीसीबी आणि निवडकर्त्यांवर प्रश्न उपस्थित केले. नुकतेच नियुक्त मुख्य निवडकर्ता इंझमाम-उल-हक यांनी आशिया कपसाठी संघाची निवड केली आहे. १८ सदस्यीय संघ २२ ते २६ ऑगस्ट दरम्यान श्रीलंकेत अफगाणिस्तानशी भिडणार आहे. त्यानंतर आशिया चषक स्पर्धेसाठी यापैकी १७ खेळाडू शॉर्ट केले जातील. आशिया चषकाचा सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात ३० ऑगस्ट रोजी होणार आहे.
दहानीने रशीद लतीफच्या माध्यमातून निवडकर्त्यांवर साधला निशाणा –
पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक रशीद लतीफने ट्विटरवर पाकिस्तानी वेगवान गोलंदाजांचे लिस्ट-ए करिअर रेकॉर्ड शेअर केले होते, त्या यादीत शाहनवाज दहानीचे नाव नव्हते. मग काय, याआधी संघात स्थान न दिल्याने संतापलेल्या शाहनवाजने लतीफला घेरले आणि ट्विट करत त्याला टोला लगावला. तसेच निवडकर्त्यांवरही निशाणा साधला.
हेही वाचा – Asia Cup 2023: “भारतीय संघ ‘या’ खेळाडूंशिवाय कमजोर”; आशिया चषकपूर्वी सलमान बटचे टीम इंडियाबद्दल मोठं विधान
क्रीडा पत्रकारांवरही उपस्थित केले प्रश्न –
रशीद लतीफच्या ट्विटला रिट्विट करत दहानीने लिहिले की, “दहानी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नाही, असे वाटत आहे”. संघ निवडीबाबत पीसीबी अधिकारी आणि निवडकर्त्यांना प्रश्न न विचारल्याबद्दल शाहनवाझने क्रीडा पत्रकारांनाही धारेवर धरले आहे. याबाबत त्याने लिहिले की, “एकही पत्रकार किंवा क्रिकेट तज्ञ प्रश्न विचारण्याची किंवा निवडकर्त्यांना ही आकडेवारी दाखवण्याची हिंमत करत नाही.”
हेही वाचा – Rohit Sharma: तिलक वर्माला विश्वचषकाच्या संघात मिळणार संधी? आता रोहित शर्माने सांगितली मोठी गोष्ट
२५ वर्षीय शाहनवाज दहानीने २०२१ मध्ये पाकिस्तानकडून टी-२० आणि २०२२ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत खेळलेल्या २ एकदिवसीय सामन्यांमध्ये २ बळी घेतले आहेत. त्याचबरोबर ११ टी-२० सामन्यांमध्ये या वेगवान गोलंदाजाने ८ बळी घेतले आहेत. दहानी सध्या लंका प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे.