Shai Hope broke Virat Kohli’s record of fastest 15 centuries in ODIs: सध्या, झिम्बाब्वेमध्ये १० संघ २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या शेवटच्या दोन स्थानांसाठी लढत आहेत. त्यात वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचाही समावेश आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पात्रता फेरीत गुरुवारी वेस्ट इंडिज आणि नेपाळ यांच्यात सामना झाला. या सामन्यात वेस्ट इंडिजने नेपाळवर १०१ धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या विजयासह वेस्ट इंडिजचा संघ अ गटात गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याचबरोबर शाई होपने शतक झळकावून किंग कोहलीच्या शतकांचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नेपाळविरुद्ध शाई होपने शानदार शतक झळकावले –

चौथ्या क्रमांकावर फलंदाजी आलेल्या वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने १२९ चेंडूत १३२ धावांची शानदार शतकी खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १० चौकार आणि ३ षटकार निघाले. होपचे वनडेतील हे १५ वे शतक आहे. होपने अवघ्या १०५ डावात आपले १५ वे शतक झळकावले. यासोबतच त्याने वनडेमध्ये सर्वात कमी डावात १५ शतके झळकावण्यात विराट कोहलीला मागे टाकले आहे.

या विक्रमाच्या यादीत बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. बाबरने केवळ ८३ डावात १५ शतके पूर्ण केली होती. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम आमला या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ८६ डावात १५ शतके झळकावली. आता या यादीत शाई होप तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे किंग कोहली चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. कोहलीने १०६ डावात एकदिवसीय क्रिकेटमधील १५ शतके पूर्ण केली होती.

हेही वाचा – IPL 2023: एमएस धोनीच्या ‘त्या’ सल्ल्यामुळे सीएसकेने अजिंक्य रहाणेला केले खरेदी, सीईओ काशी विश्वनाथन यांचा खुलासा

बाबर आझमला या बाबतीत टाकले मागे –

शाई होपने २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत बाबर आझमला मागे टाकले आहे. गेल्या विश्वचषकानंतर होपचे हे नववे शतक आहे. त्याचवेळी, २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकापासून बाबरने आठ शतके झळकावली आहेत.

सर व्हिव्ह रिचर्ड्सलाही मागे टाकले –

२०१६ मध्ये वनडेमध्ये पदार्पण करणाऱ्या शाई होपने आतापर्यंत १०५ डावांमध्ये ५०.८० च्या सरासरीने ४६७४ धावा केल्या आहेत. तो एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सरासरी धावा करणारा कॅरेबियन फलंदाज आहे. या अगोदर हा विक्रम व्हिव्ह रिचर्ड्सच्या नावावर होता.

हेही वाचा – ODI WC 2023 Qualifiers: हरारे स्पोर्ट्स क्लबला भीषण आग, आयसीसीने सामन्यांच्या आयोजनाबाबत घेतला ‘हा’ निर्णय

सामन्याबद्दल बोलायचे तर, प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ५० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात ३३९ धावा केल्या. होपने १३२ तर पूरनने ११५ धावांची खेळी केली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी २१६ धावांची भागीदारी केली. त्याचवेळी नेपाळचा संघ ४९.४षटकांत २३८ धावांत गारद झाला. त्याच्याकडून आरिफ शेखने ६३ आणि गुलशन झाने ४२ धावा केल्या. या सामन्यात नेपाळकडून ललित राजवंशीने तीन बळी घेतले. त्याचवेळी जेसन होल्डरने वेस्ट इंडिजकडून तितक्याच विकेट घेतल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shai hope broke virat kohlis record of fastest 15 centuries in odis vbm
Show comments