Shakib Al Hasan Super Over Controversy: शकीब उल हसन आणि वाद यांचं नातं जुनं आहे. याखेपेस शकीब उल हसनच्या एका निर्णयामुळे त्याच्या संघावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली आणि त्यांनी पर्यायाने जेतेपदही गमावलं. जेतेपदाचे दावेदार असलेल्या संघाला कर्णधाराच्या एका निर्णयामुळे गाशा गुंडाळावा लागला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शकीब ग्लोबल टी२० कॅनडा या स्पर्धेत खेळतो आहे. या स्पर्धेतील बांगला टायगर्स मिसिसॉगा संघाचा तो कर्णधार आहे. बांगला टायगर्स आणि टोरंटो नॅशनल्स यांच्यात एलिमिनेटरचा सामना होणार होता. पण सततच्या पावसामुळे हा सामना सुरू होण्यात अडथळा येत होता. सामन्याचा निकाल लावण्यासाठी पंचांनी दोन्ही कर्णधारांसमोर ५-५ षटकांचा सामना करण्याचा प्रस्ताव ठेवला. निकालासाठी पाच षटकांचा सामना होणं आवश्यक होतं. पण पावसामुळे तेही होऊ शकलं नाही. अशा परिस्थितीत सुपर ओव्हरची तरतूद नियमांमध्ये होती. सामनाधिकाऱ्यांनी सुपर ओव्हर खेळण्यासंदर्भात शकीबला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकला नाही. हे संघासाठी योग्य नसल्याचं त्याला वाटलं.

हेही वाचा – Vinesh Phogat: ‘१५-१५ रूपयांत मेडल खरेदी करा…’ विनेश फोगटची याचिका फेटाळल्यानंतर बजरंग पुनियाची धक्कादायक पोस्ट, पीटी उषानेही सुनावलं

सुपर ओव्हरच्याऐवजी काही षटकांचा सामना खेळवावा असं शकीबला वाटत होतं. शकीबचं हे म्हणणं पंच आणि सामनाधिकाऱ्यांना ऐकलं नाही. यामुळे शकीब उल हसन सुपर ओव्हरआधी नाणेफेकीसाठी आलाच नाही. नाणेफेकीसाठी अनुपलब्ध राहिल्यास काय परिणाम होऊ शकतात याची कल्पना शकीबच्या संघाला देण्यात आली. शकीब न आल्याने पंचांनी टोरंटो नॅशनल्स संघाला विजयी घोषित केलं. पावसामुळे सामना रद्द झाला असता तर शकीबचा संघ क्वालिफायर२ लढतीत पोहोचला असता कारण गुणतालिकेत टोरंटो नॅशनल्स संघापेक्षा शकीबचा संघ पुढे होता.

अखेर पंचांनी टोरंटो नॅशनल्स संघाला विजयी घोषित केलं. या विजयासह टोरंटो नॅशनल्सचा संघ क्वालिफायर२ सामन्यासाठी पात्र ठरला. शकीबच्या संघाला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं. बांगला टायगर्स संघाने स्पर्धेत चार सामने जिंकले होते तर तीनमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

हेही वाचा – Independence Day 2024: ऑलिम्पिकचे आयोजन भारतात करण्याबाबत पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य, स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात म्हणाले….

ब्रॅम्पट्न वॉल्व्ह्स आणि मॉन्ट्रेअर टायगर्स यांच्यातील क्वालिफायर१चा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. गुणतालिकेत आघाडीवर असल्यामुळे माँट्रेअलचा संघ अंतिम लढतीत पोहोचला.

दरम्यान बांगला टायगर्स संघाचे मालक झफीर यासिन यांनी यासंदर्भात भूमिका मांडली. पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी सुपर ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लावायला नको होता असं यासिन म्हणाले. ग्लोबल टी२० कॅनडा स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉय भट्टाचार्य यांनी मात्र सुपर ओव्हरद्वारे निकालासाठी प्रयत्न नियमाला धरूनच होता असं म्हटलं आहे. ‘सुपर ओव्हरचा नियम नव्याने तयार करण्यात आला नाही. नियमात तसा उल्लेख होता. पहिल्या लढतीलाही पावसाचा फटका बसला होता’, असं ते म्हणाले.

हेही वाचा – Aman Sehrawat: कांस्यपदक विजेता अमन सेहरावतला रेल्वेकडून मिळालं प्रमोशन, स्वप्नील कुसाळेनंतर अमनलाही दिली स्पेशल ड्युटी

पुढे काय झालं?
शकीबच्या संघाने सुपर ओव्हरला नकार दिल्यामुळे टोरंटो नॅशनल्स संघ क्वालिफायर २ सामन्यासाठी पात्र ठरला. या लढतीत त्यांनी ब्रॅम्पटन वॉल्व्हस संघावर ५ विकेट्सनी विजय मिळवला. ब्रॅम्पटन संघाने १४१ धावांची मजल मारली. निक हॉबसनने सर्वाधिक ५१ धावांची खेळी केली. टोरंटो संघातर्फे रोमारिओ शेफर्डने ४ विकेट्स पटकावल्या. टोरंटो संघाने ५ विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य गाठलं. कर्णधार कॉलिन मुन्रोने ३६ धावांची खेळी केली.

अंतिम लढतीत टोरंटो संघाने माँट्रेअल टायगर्स संघाला ८ विकेट्सनी नमवत जेतेपदावर नाव कोरलं. टोरंटो संघाने माँट्रेअल संघाला ९१ धावातच रोखलं. कॉबिन बॉचच्या ३५ धावांव्यतिरिक्त माँट्रेअलच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. अँड्रियस गौसच्या ५८ धावांच्या खेळीच्या बळावर टोरंटो संघाने हे लक्ष्य गाठलं. रासी व्हॅन डर डुसेने ३० धावा करत त्याला चांगली साथ दिली. जेसन बेहनड्रॉफला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakib al hasan bangla tigers team knocked out of global t20 after refusing to play super over know the full incident bdg