Shakib Al Hasan: बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकिब अल हसनला स्वत:च्याच मायदेशात जाणं अशक्य होऊन बसलं आहे. शकिब अल हसन सध्या बांगलादेशबाहेर असून तो अमेरिकेत आपल्या कुटुंबाबरोबर राहत आहे. टी-२० मधून नुकतीच निवृत्ती घेतलेल्या शकिबने कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. भारताविरूद्ध झालेल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये तो खेळला होता. यानंतर तो मीरपूरमध्ये अखेरची कसोटी खेळणार असल्याचे सांगितले होते. पण आता शकिब अल हसन मायदेशी परतणार नसल्याचे त्याने सांगितले आहे.

२१ ते २५ ऑक्टोबर दरम्यान मीरपूर, ढाका येथे होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी शकिब बांगलादेशला परतणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी शकिबचा बांगलादेशच्या संघात समावेश करण्यात आला होता, जो त्याचा या फॉरमॅटमधील अंतिम सामना होता.

हेही वाचा – RSAW vs AUSW: बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत दाखल, आफ्रिकन संघाने घेतला मोठा बदला

“पण मी बांगलादेशात परतणार नाही…”, शकिब अल हसनला आपल्याच मायदेशात जाणं कठीण

इएसपीएनक्रिकइन्फोला शकिबने सांगितले की, “मला माहित नाही की मी पुढे कुठे जाईन पण मी बांगलादेशला जाणार नाही हे जवळजवळ निश्चित आहे,” शकिब त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेच्या चिंतेमुळे बांगलादेशला परतण्याबद्दल काळजीत आहे. एक स्टार क्रिकेटपटू असण्यासोबतच, शकिब हा माजी खासदार देखील आहे. अवामी लीगच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये शकिब हा संसदेत सदस्य होता. देशव्यापी निदर्शने होऊन ऑगस्टमध्ये सरकार पडल्यानंतर बांगलादेशातील वातावरण खराब झाले आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?

३७ वर्षीय शकिबने गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण त्याने सांगितले की त्याला घरच्या मैदानावर एक शेवटची कसोटी मालिका खेळायची आहे, त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला. देशातील अराजकतेच्या काळात कथित हत्येप्रकरणी एफआयआरमध्ये नाव असलेल्या १४७ लोकांपैकी तो एक होता. पण बांगलादेश क्रिकेटने जाहीर केले तो दोषी सिद्ध होईपर्यंत संघासाठी खेळत राहिल.

हेही वाचा – IND vs NZ: “DSP आहे आता तो…”, मोहम्मद सिराज आणि डेव्हॉन कॉन्वे लाईव्ह सामन्यातच भिडले, सुनील गावसकरांच्या वाक्याने वेधलं लक्ष

बांगलादेशचे सध्याचे युवा आणि क्रीडा सल्लागार आसिफ महमूद यांनीही खेळाडूला मायदेशात न परतण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की, “कोणतीही अनुचित परिस्थिती टाळण्यासाठी मी शकीबला [बांगलादेशात] न येण्याचा सल्ला दिला आहे. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आणि देशाच्या प्रतिमेचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे,” असे त्यांनी एएफपीला सांगितले.

दक्षिण आफ्रिकेचा संघ २ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना २१ ऑक्टोबरपासून मीरपूरमध्ये खेळवला जाणार आहे. मालिकेतील दुसरा सामना २९ ऑक्टोबरपासून चट्टोग्राम येथे होणार आहे.