टी-२० विश्वकरंडक स्पर्धा २०२१ आता अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान स्पर्धेतून एक निराशादायक बातमी समोर आली आहे. बांगलादेश संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन स्पर्धेबाहेर पडला आहे. शाकिब हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला. विंडीजविरुद्धच्या पराभवामुळे बांगलादेशचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले.
शाकिबचे बाहेर जाणे, ही बांगलादेश संघाला त्यांची बेंच स्ट्रेंथ तपासण्याची चांगली संधी असेल. त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही आणि ते अभिमानाने खेळतील. बांगलादेशसाठी ही निराशाजनक स्पर्धा असली, तरी शाकिबसाठी वैयक्तिक पातळीवर ती संस्मरणीय ठरली. तो टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला.
हेही वाचा – T20 WC: भारताच्या माजी क्रिकेटपटूने अंतिम फेरीबाबत भविष्यवाणी करताच क्रीडाप्रेमी संतापले; म्हणाले…!
शाकिबने श्रीलंकेविरुद्ध पाथुम निसांका आणि अविष्का फर्नांडो यांना बाद करत हा बहुमान मिळवला. ३४ वर्षीय शाकिबने या स्पर्धेत ४० विकेट्स घेतल्या आहेत. त्याने पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीवर मात केली. आफ्रिदीने ३९ बळी घेतले असून लसिथ मलिंगा आणि सईद अजमल यांनी अनुक्रमे ३८ आणि ३६ बळी घेतले आहेत.
मलिंगाला टाकले मागे
शाकिब अल हसनने नुकताच श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा मोठा विक्रमही मोडला. तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने ९३ डावात ११७ विकेट्स घेतल्या आहेत. २० धावांत ५ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. लसिथ मलिंगा १०३ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. राशिद खानने १०२ आणि टीम साऊदीने १०० विकेट्स घेतल्या आहेत.