येत्या २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) आशिया चषक खेळवला जाणार आहे. या संपूर्ण स्पर्धेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. तेव्हापासून स्पर्धेत संघांची निवड कधी होणार याची प्रतिक्षा चाहत्यांना होती. आता ही प्रतिक्षा संपली आहे. पाकिस्तान, श्रीलंका आणि भारतापाठोपाठ बांगलादेश क्रिकेट नियामक मंडळाने आशिया चषकासाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. याशिवाय, आशिया चषक आणि टी २० विश्वचषकासाठी कर्णधाराची निवडही करण्यात आली आहे.
बांगलादेश क्रिकेट नियामक मंडळाने शाकीब अल हसनची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. याशिवाय संघात मुशफिकुर रहीम, सब्बीर रहमान, इबादत हुसेन आणि मोहम्मद सैफुद्दीन यांचेही पुनरागमन झाले आहे. मुनीम शहरयार, नजमुल हुसेन आणि शरीफुल इस्लामला संघात स्थान मिळालेले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बांगलादेश क्रिकेट नियामक मंडळाने नुरुल हसनचा संघात समावेश केला आहे.
आशिया चषकाचे आयोजन श्रीलंकेत केले जाणार होते. मात्र, तेथील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थिती बघता आशिया चषक श्रीलंकेतून यूएईमध्ये हलवण्यात आला आहे. स्पर्धा जरी श्रीलंकेत होणार नसली तरी, लंकेकडे यजमान पदाचे सर्व अधिकार असतील. ग्रुप स्टेजच्या सामन्यांनंतर ‘सुपर फोर’ टप्पा असेल आणि सर्वोत्तम दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील.
आशिया चषक स्पर्धेसाठी निवड झालेला बांगलादेश संघ : शाकीब अल हसन (कर्णधार), अनामूल हक, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसेन, मोसाद्देक हुसेन, महमुदुल्लाह, महेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद, सब्बीर रहमान, मेहदी हसन मिराझ, इबादोत हुसेन, परवेझ हुसेन इमोन, नुरुल हसन सोहन आणि तस्किन अहमद.