IND vs AUS, 4th T20I: रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या T20I साठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना, एक लाजिरवाणी समस्या निर्माण झाल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार, २००९ सालापासून बिल भरले नसल्यामुळे हा सामना मैदानावर विजेशिवाय खेळवला जाणार असल्याचे समजतेय.
शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमचे ३ कोटी १६ लाखाचे बिल थकबाकी आहे. यामुळेच ५ वर्षांपूर्वी वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी तात्पुरते कनेक्शन अस्तित्वात असताना, ते फक्त प्रेक्षकांच्या गॅलरी आणि प्रेस बॉक्ससाठी पुरेसे आहे. शहराचे ग्रामीण सर्कल प्रभारी अशोक खंडेलवाल यांनी सांगितले की, स्टेट क्रिकेट असोसिएशनच्या सचिवांनी स्टेडियममधील तात्पुरती कनेक्शन सुविधा वाढवण्यासाठी अर्ज केला आहे.सध्या स्टेडियमची क्षमता २०० किलोव्हॅट असून ती १ हजार किलोव्हॅट पर्यंत वाढविण्याची विनंती करण्यात आली होती, ती मंजूर झाली आहे, परंतु त्यावर अद्याप काम सुरू झालेले नाही.
दरम्यान, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी पाच सामन्यांची टी २० मालिका खेळली जात आहे. यात पहिले दोन गेम गमावल्यानंतर, ग्लेन मॅक्सवेलने चौथ्यांदा T20I शतक झळकावल्यामुळे ऑस्ट्रेलियाने एक विजय आपल्या खात्यात जोडला आहे. तिसऱ्या सामन्यात मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली आणि ऋतुराज गायकवाडच्या नाबाद १२३ धावांच्या जोरावर भारताने निर्धारित २० षटकांत २२२ धावांपर्यंत मजल मारली होती. मॅक्सवेलच्या खेळीने ऑस्ट्रेलियाला बळ मिळाले होते.
दुसरीकडे, चौथ्या सामन्याच्या आधी मॅक्सवेल मायदेशी परतल्याने आणि श्रेयस अय्यर संघात परतल्याने, टीम इंडियाला मालिका जिंकण्याची मोठी संधी आहे.