पीटीआय, नवी दिल्ली : जायबंदी जसप्रीत बुमराची भारतीय संघात जागा घेण्यासाठी प्रमुख दावेदारांपैकी दीपक चहरलाही पाठीच्या दुखापतीमुळे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला मुकावे लागणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत बुमराच्या जागेसाठी मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दूल ठाकूर यांच्यात स्पर्धा असून हे तिघेही लवकरच ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहेत.

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात दाखल झाला. मात्र, या स्पर्धेसाठी राखीव खेळाडू म्हणून निवड झालेले फलंदाज श्रेयस अय्यर आणि लेग-स्पिनर रवी बिश्नोई हे खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या एकदिवसीय मालिकेत खेळले. तसेच या मालिकेसाठी चहरचीही भारतीय संघात निवड झाली होती. परंतु पाठीच्या दुखापतीमुळे तो या मालिकेत खेळू शकला नाही. त्याऐवजी तो बंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) दाखल झाला. तिथे त्याची दुखापत काहीशी गंभीर असल्याचे स्पष्ट झाले.

‘‘दीपकला पूर्णपणे तंदुरुस्त होण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. तो पुन्हा पाठदुखीने त्रस्त आहे. त्याच्या पायालाही दुखापत असल्याची चर्चा होती. परंतु त्यात तथ्य नाही. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत ‘बीसीसीआय’ने शमी, सिराज आणि शार्दूल या तिघांना ऑस्ट्रेलियात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या भारतीय संघात बुमराची जागा कोण घेणार हे निश्चित करण्यासाठी १५ ऑक्टोबपर्यंतचा वेळ आहे. त्यामुळे शमी, सिराज आणि शार्दूल यांना त्वरित ऑस्ट्रेलियात नेऊन त्यांची तंदुरुस्ती आणि लय तपासण्याचा भारतीय संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. तसेच भारताचा सलामीचा सामना २३ ऑक्टोबरला होणार असल्याने ऑस्ट्रेलियातील परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी या खेळाडूंना पुरेसा वेळ मिळेल.

शमीला ऑस्ट्रेलियात खेळण्याचा सर्वाधिक अनुभव असल्याने बुमराची जागा घेण्यासाठी त्याला पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत सिराजने चमकदार कामगिरी केली. त्याने या मालिकेच्या तीन सामन्यांत पाच बळी मिळवताना मालिकावीराचा पुरस्कार पटकावला. तसेच मुंबईकर शार्दूलमध्ये गोलंदाजीसह फलंदाजीचीही क्षमता असल्याचा भारतीय संघाला फायदा होऊ शकेल.

श्रेयस, बिश्नोई मायदेशीच!

ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई यांची राखीव खेळाडू म्हणून भारतीय संघात निवड झाली असली, तरी ते सध्या मायदेशीच थांबणार आहेत. श्रेयसने आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावताना सर्वाना प्रभावित केले. परंतु भारतीय संघाला एका अतिरिक्त फलंदाजाची आवश्यकता भासली, तरच श्रेयसला ऑस्ट्रेलियात पाठवले जाईल, असे समजते. तसेच प्रमुख लेग-स्पिनर यजुर्वेद्र चहलला दुखापत झाल्यास त्याची जागा घेण्यासाठी बिश्नोईचा विचार होईल.

ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे दावेदार

भारत : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २००७मध्ये पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यानंतर मुंबईमध्ये भारतीय खेळाडूंचे ज्या थाटामाटात स्वागत झाले, ते आजही प्रत्येक क्रिकेटरसिकाच्या स्मरणात आहे. भारतीय संघाने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना २०११मध्ये एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३मध्ये चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. परंतु त्यानंतरच्या नऊ वर्षांत ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धामध्ये भारताला जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात जेतेपदाचा हा दुष्काळ संपवण्याची भारतीय संघाला संधी मिळणार आहे. जागतिक ट्वेन्टी-२० क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या भारतीय संघाकडून चाहत्यांना दर्जेदार कामगिरीची अपेक्षा आहे.

  • बलस्थाने : फलंदाजी हे भारताचे बलस्थान असून कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या चौकडीला रोखणे हे प्रतिस्पर्धी संघांतील गोलंदाजांपुढे मोठे आव्हान असेल. या चौघांनीही अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. हार्दिक पंडय़ा आणि दिनेश कार्तिक हे अनुभवी फलंदाज विजयवीराची भूमिका बजावतील. हार्दिकने गेल्या काही महिन्यांत आपली तंदुरुस्ती सिद्ध करताना सातत्याने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. याचा भारतीय संघाला फायदा होईल.
  • कच्चे दुवे : ट्वेन्टी-२० विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय संघाला गोलंदाजांची चिंता आहे. जसप्रीत बुमरा या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याने भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. त्याच्या जागी अनुभवी मोहम्मद शमीची भारतीय संघात निवड होणे अपेक्षित आहे. या संघात भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल या अन्य तीन वेगवान गोलंदाजांचा समावेश आहे. परंतु भुवनेश्वर आणि हर्षल यांच्या कामगिरीत सातत्य नसून अर्शदीपला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा फारसा अनुभव नाही.
  • जेतेपद : एकदा (२००७)
  • गेल्या विश्वचषकातील कामगिरी : साखळी फेरीत गारद ल्ल संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, यजुर्वेद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

Story img Loader