Shan Masood angry on Jason Gillespie in dressing room after Babar Azam dropped : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. रावळपिंडी येथे खेळल्या जात असलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तान संघ ९४ धावांनी पिछाडीवर आहे. हा सामना अनिर्णितकडे जाताना पाहून पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद आपला संयम गमावताना दिसला. वास्तविक, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी कर्णधार शान मसूद संघाचे मुख्य प्रशिक्षक जेसन गिलेस्पी यांच्यावर राग व्यक्त करताना दिसत आहे.
पाकिस्तानचा कर्णधार प्रशिक्षकावर का संतापला?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद चांगलाच संतापलेला दिसत आहे. हा व्हिडिओ ड्रेसिंग रूममधला आहे, ज्यात तो संघाचे प्रशिक्षक जेसन गिलेस्पीसमोर रागावताना दिसत आहे. त्याच्यासोबत कोचिंग स्टाफही उपस्थित आहे जो कर्णधाराला शांत राहण्यास सांगत आहे. या संपूर्ण संभाषणात प्रशिक्षक कोणतीही प्रतिक्रिया देताना दिसत नाहीत. यानंतर दोघेही ड्रेसिंग रूमकडे जाताना दिसत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दावा केला जात आहे की, पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार शान मसूद बाबर आझमने सोडलेला सोपा झेल पाहून संतापला होता. त्याचबरोबर बाबरच्या खराब फलंदाजीमुळे पण कर्णधार त्याच्यावर नाराज आहे. कारण तो पहिल्या डावात तो स्वस्तात बाद झाला होता.
पाकिस्तान-बांगलादेश सामन्याची स्थिती –
या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीला आलेल्या पाकिस्तान संघाने पहिल्या डावात १६ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, यानंतर संघाचा उपकर्णधार सौद शकील आणि मोहम्मद रिझवान या जोडीने २४० धावांची भागीदारी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. शकीलने १४१ धावा केल्या तर रिझवानने १७१ धावांची नाबाद खेळी साकारली.
हेही वाचा – Shaheen Afridi : शाहीन शाह आफ्रिदी बनला बापमाणूस! पत्नी अंशाने दिला मुलाला जन्म, जाणून घ्या काय ठेवलं नाव?
पाकिस्तान संघाने आपला पहिला डाव ४४८ धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात बांगलादेश संघानेही मुशफिकर रहीमच्या १९१ धावा आणि लिटन दास आणि मेहंदी हसन मिराजच्या अर्धशतकांच्या जोरावर ५६५ धावा केल्या. पाकिस्तानने दुसऱ्या डावात २३ धावांत १ गडी गमावला असून तो बांगलादेशपेक्षा अजूनही ९४ धावांनी मागे आहे. आज अखेरच्या दिवसाचा खेळ खेळला जाणार आहे. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहील, असे मानले जात आहे.
पाकिस्तानसाठी विजय आवश्यक –
पाकिस्तान संघाला बांगलादेशविरुद्धची ही मालिका जिंकायची आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाची आहे. पाकिस्तानने ही मालिका गमावल्यास किंवा अनिर्णित राहिल्यास संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणे कठीण होईल. पाकिस्तान संघ सध्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.