जगातील सर्वकालिक महान लेगस्पिन म्हणून आपली ओळख प्रस्थापित केलेला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न याचे अनेक विक्रम अजूनही कुणी मोडू शकलेलं नाही. आपल्या कारकिर्दीत शेन वॉर्ननं १४५ कसोटी सामन्यांमध्ये तब्बल ७०८ बळी घेतले आहेत तर एकदिवसीय सामन्यांमध्ये २९३! आपल्या काळात जगभरातल्या फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या शेन वॉर्ननं आता पाकिस्तानला धडकी भरवणारा एक खळबळजनक खुलासा केला आहे. १९९४च्या एका कसोटी सामन्यादरम्यान घडलेला एक धक्कादायक प्रकार शेन वॉर्ननं त्याच्या ‘शेन’ या आगामी डॉक्युमेंटरीमध्ये कथन केला आहे.

काय घडलं त्या भेटीत?

सलीम मलिक पाकिस्तानचा माजी कर्णधार. १९९४ साली ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यातील एका सामन्यात चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ही घटना घडल्याचं वॉर्न म्हणाला. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी ७ विकेट्स हव्या होत्या. कराची नॅशनल स्टेडिमवर हा सामना सुरू होता. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर सलीम मलिकनं शेन वॉर्नला भेटायला बोलावलं.

शेन वॉर्न म्हणतो, “मी दरवाजा ठोठावला. सलीम मलिकनं दरवाजा उघडला. मी आत गेलो आणि बसलो. सलीम मलिकनं बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, आपला सामना फार उत्तम सुरू आहे. मी म्हणालो, खरंय..मला वाटतं आम्ही उद्या जिंकू”!

…आणि मलिक म्हणाला, “आम्ही हरू शकत नाही”!

शेन वॉर्ननं आपल्या आणि सलीम मलिकच्या मध्ये त्या दिवशी घडलेला पूर्ण घटनाक्रम सांगितला. सामन्याविषयी चर्चा सुरू झाल्यानंतर ज्या क्षणी शेन वॉर्न म्हणाला की मला वाटतं आम्ही उद्या जिंकू, त्यावेळी सलीम मलिकनं त्याला सपशेल खोडून काढलं. वॉर्न सांगतो, “तो (सलीम मलिक) म्हणाला, खरं सांगायचं तर आम्ही हरू शकत नाही. तुला माहिती नाही की जर आम्ही पाकिस्तानमध्ये हरलो, तर काय घडतं. आमची घरं जाळली जातील. आमच्या नातेवाईकांची घरं जाळली जातील.”

सलीम मलिकची ‘ती’ ऑफर!

पाकिस्तानचे तीन गडी बाद झाले होते. तेव्हा सलीम मलिकने शेन वॉर्नला खराब बॉलिंग टाकण्यासाठी पैसे देऊ केल्याचं वॉर्ननं सांगितलं. “मलिकनं खराब बॉलिंग टाकण्यासाठी मला आणि टीम मे ला प्रत्येकी १ कोटी ४० लाखांची ऑफर दिली. त्यानं आम्हाला वाईड ऑफ द स्टम्प्स बॉलिंग टाकायला सांगितली”, असं वॉर्न म्हणाला.

श्रीलंकेच्या खेळाडूचा कसोटी क्रिकेटला रामराम; ७ जानेवारी तारीख ठरली खास!

ऑफर दिली, पण पुढे काय?

पण आम्ही ही ऑफर पूर्णपणे धुडकावून लावल्याचं वॉर्न सांगतो. “मला त्या बोलण्यामुळे धक्का बसला. मी म्हणालो, मला कळत नाहीये यावर काय बोलायचं. मी थोडा वेळ शांत बसलो आणि म्हणालो खड्ड्यात जा मित्रा. आम्ही तुम्हाला हरवणार आहोत”, असं वॉर्न म्हणाला. “या प्रकाराविषयी मी आणि टीमनं कर्णधार मार्क टेलर आणि प्रशिक्षक बॉब सिम्पसन यांना सांगितलं. त्यानंतर याबाबत मॅच रेफरी जॉन रेड यांना देखील कळवण्यात आलं”, असं वॉर्न म्हणाला.

“त्या दिवसांमध्ये..म्हणजे जवळपास ३० वर्षांपूर्वी, या सगळ्या गोष्टींची काहीही चर्चा नसायची. फिक्सिंगनं कोणत्याही खेळामध्ये तोपर्यंत आपलं अस्तित्व दाखवलं नव्हतं. जेव्हा त्याने मला ऑफर दिली, तेव्हा मला वाटलं हा काय प्रकार आहे? मला त्याविषयी काहीही माहिती नव्हतं”, असं देखील वॉर्ननं स्पष्ट केलं आहे.

पाकिस्ताननं तो सामना एका विकेटने जिंकला. इंझमाम उल हक आणि ११व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मुश्ताक अहमदनं ५७ धावांची भागीदारी करत सामना जिंकून दिला. पण शेन वॉर्न १५० धावांच्या बदल्यात घेतलेल्या ८ विकेट्ससाठी सामनावीराचा मानकरी ठरला. “त्या विजयानंतर मलिकच्या चेहऱ्यावर विचित्र हावभाव होते. आम्ही हरलोच नसतो. आम्ही इंझमामला काही वेळा तर पायचीतही केलं होतं. जो अँगल बॉलिंग टाकत होता. पण तेव्हा तटस्थ अंपायर्स नव्हते”, असं वॉर्न म्हणाला.

जणूकाही तो मला खुणावत होता, तू पैसे घ्यायला हवे होतेस!

त्या प्रसंगाविषयी वॉर्न सांगतो, “सामना संपल्यानंतर आम्ही शेवटच्या कार्यक्रमासाठी उभे होतो. मी पाकिस्तानच्या संघाकडे पाहात होतो. आणि सलीम मलिक तिथे बसला होता आणि एक विचित्र हावभाव त्याच्या चेहऱ्यावर होते. जणूकाही तो मला खुणावत होता, की तू ते पैसे घ्यायला हवे होतेस”!

Story img Loader