ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या निधनानंतर त्याचा शवविच्छेदनाचा अहवाल समोर आलाय. यामध्ये त्याचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचं म्हटलं असून त्याबद्दल कोणताही संशय नसल्याचा उल्लेख केलाय. दरम्यान शेन वॉर्नच्या मृत्यूसंदर्भात रोज नवीन नवीन माहिती आणि खुलासे समोर येत आहेत. शेन वॉर्न थायलंडमधील ज्या रिसॉर्टमध्ये थांबला होता तेथील सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शेन वॉर्न आणि त्याच्या मित्रांना मसाज देण्यासाठी थायलंडमधील चार महिला रिसॉर्टमध्ये आल्याचं दिसत आहे. मात्र हे सीसीटीव्ही फुटेज शेन वॉर्नचा मृत्यू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांनंतरचं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

घडलं काय?
डेलीमेल डॉट को डॉट युकेने दिलेल्या वृत्तानुसार एका महिलेने रिसॉर्टच्या रिसेप्शनवर आपण शेन वॉर्नला फूटमसाज देण्यासाठी आल्याचं सांगत प्रवेश केला. मात्र ती महिला जेव्हा त्या वॉर्नच्या रुमच्या दरवाजाजवळ गेली आणि तिने दरवाजा वाजवला तेव्हा दरवाजा उघडण्यात आला नाही. त्यानंतर आत रुममध्ये वॉर्न मृतावस्थेत पडल्याचं नंतर समोर आलं. ४ मार्च रोजी वॉर्नचं थायलंडमधील सामुजान व्हिला येथे निधन झालं. तो त्याच्या मित्रांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेला होता.

फुटेजमध्ये काय?
थायलंड पोलिसांना जे सीसीटीव्ही फुटेज मिळालंय त्यामध्ये चार महिला एकाचवेळी लॉबीमधून बाहेर पडताना दिसत आहेत. शेन वॉर्नचा मृतदेह रुममध्ये आढळण्याच्या काही मिनिटांपूर्वीची ही दृष्य असल्याचं सांगण्यात येत आहे. या चार महिलांनी दिलेल्या जबाबनुसार त्यांना पाच वाजता वॉर्न आणि त्याच्या मित्रांना मसाज देण्यासाठी बोलवण्यात आलेलं. यामध्ये मसाज, फुटमसाज आणि नेल ट्रीटमेंट करायची असल्याची ऑर्डर देण्यात आलेली.

महिलांनी काय माहिती दिली?
या महिलेने दिलेल्या माहितीनुसार ती शेन वॉर्नच्या रुमजवळ पोहचली आणि तिने दरवाजा वाजला तेव्हा आजमधून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर या महिलेने तिच्या बॉसला मेसेज करुन वॉर्न दरवाजा उघडत नाहीय अशी माहिती दिली. या महिलेला दरवाजा उघडता आला नाही तेव्हा वॉर्नच्या मित्रांनी दरवाजा उघडला. या साऱ्या प्रकारानंतर काही वेळातच वॉर्नचं निधन झाल्याची माहिती समोर आली. सर्वांनी रुममध्ये प्रवेश केला तेव्हा वॉर्न मृतावस्थेत आढळून आला. त्याला सीपीआर म्हणजेच तोंडाने श्वास देण्याचा प्रयत्न एका मित्राने केला. तितक्यात दुसऱ्याने रुग्णवाहिका बोलावली. मात्र रुग्णालयामध्ये पोहोचण्यापूर्वीच वॉर्नचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. महिलांनी दिलेल्या माहितीनुसार वॉर्न आणि त्याच्या मित्रांनी संपूर्ण मसाजसाठी बुकिंग केली होती. मात्र वॉर्नने रुमचा दरवाजा न उघडल्याने त्यांनी इतर मित्रांशी संपर्क साधून दरवाजा उघडला.

वॉर्नला शेवटचं जिवंत पाहणाऱ्या त्या दोघीच…
डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार, रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेज हे स्थानिक वेळेनुसार दुपारी दोनच्या आसपासचं आहे. मजास करण्यासाठी आलेल्या चार महिलांपैकी दोन महिला वॉर्नच्या रुमकडे गेल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याच दोन महिला आहेत ज्यांनी वॉर्नला शेवटचं जिवंत पाहिलं होतं.

पोलिसांनी जारी केली माहिती…
वॉर्नच्या मृत्यूसंदर्भात थायलंड पोलिसांनी एक पत्रक जारी केलं आहे. यामध्ये वॉर्नचं निधन सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास झालं. त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झालं. त्याच्या रुममध्ये अशी कोणतीही गोष्ट आढळून आली नाही ज्यामुळे त्याच्या मृत्यूसंदर्भात शंका घेता येईल. शेन वॉर्नच्या शवविच्छेदन अहवालामध्येही कोणतीही शंका घेण्यासाठी गोष्ट आढळून आलेली नाही.

त्या महिलांचा मृत्यूशी काही संबंध आहे का?
थायलंड पोलिसांच्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर वॉर्नने या महिलांना मसाज सेवा देण्यासाठी बोलावलं होतं. मात्र या महिलांचा त्याच्या मृत्यूशी काहीही संबंध नाहीय, असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.

रक्ताचे डाग…
पोलिसांनी यापूर्वी जारी केलेल्या माहितीमध्ये वॉर्नच्या रुममध्ये रक्ताचे डाग आढळून आले होते. मात्र ते सीपीआर देताना पडल्याची माहिती नंतर देण्यात आली. सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी काही दिवसांच्या ट्रीपवर गेलेल्या वॉर्नच्या ट्रीपच्या दुसऱ्या दिवशीच मृत्यू झाला. तो ५२ वर्षांचा होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shane warne death thailand resort massage room booking police cctv scsg
Show comments