ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्नचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. थायलंडमधील कोह सामुई येथील निवासस्थानी वयाच्या ५२ व्या वर्षी शुक्रवारी (३ मार्च) वॉर्नचे निधन झाले. या निवासस्थानी त्याच्यासोबत चार मित्र होते. या मित्रांनी शेन वॉर्नला मृत्यूच्या दाढेतून सोडवण्यासाठी वीस मिनिटे प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचं समोर येतंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेन वॉर्नचा मृत्यू झाला त्यावेळी नेमकं काय घडलं याची माहिती थायलंडमधील बो पूट येथील पोलीस अधिकारी चॅटचाविन नाकमुसिक यांनी रॉयटर्सला दिली. या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून शेन वॉर्न थायलंडमधील कोह सामुई येथील निवासस्थानी त्याच्या मित्रांसोबत राहत होता. मात्र शुक्रवारी संध्याकाळी शेन वॉर्न जेवणासाठी उठलाच नाही. त्याचीच चौकशी करण्यासाठी एक मित्र शेन वॉर्नकडे गेला होता. मात्र शेन वॉर्न शुद्धीवर नसल्याचं त्याला समजंल. त्यानंतर शेन वॉर्न शुद्धीत यावा म्हणून त्याच्यावर सीपीआर करण्यात आला. यामध्ये त्याच्या मित्रांना यश आले नाही आणि अखेर शेन वॉर्नने या जगाचा निरोप घेतला.

तसेच शेन वॉर्नला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्याच्या मित्रांनी रुग्णवाहिका बोलावली होती. मित्रांनी रुग्णालयाला माहिती दिल्यानंतर कोह सामुई येथील शेन वॉर्नच्या व्हिलावर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम दाखल झाली होती. या टीमनेदेखील वॉर्नला १०-२० मिनिटे सीपीआर दिला. त्यानंतर थाई आंतरराष्ट्रीय रुग्णालयाची एक रुग्णवाहिका आली. या रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनीही पाच मिनिटांसाठी शेन वॉर्नला सीपीआर दिला. मात्र हे सर्व प्रयत्न फोल ठरले आणि अखेर शेन वॉर्नचे निधन झाले, अशी माहिती चॅटचाविन या पोलीस अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर ऑस्ट्रेलियाचे विदेशमंत्री मॅरिस पायने यांनी शेन वॉर्नच्या मित्रांसोबत संवाद साधल्याची माहिती दिली आहे. तसेच पुढच्या मदतीसाठी थायलंकडे रवाना होणार असल्याचंही मॅरिस यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shane warne died due to heart attack friend battled for 20 minutes to save his life prd
Show comments