ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचं पुन्हा एकदा कौतुक केलं आहे. सध्याच्या घडीला सर्वोत्तम खेळाडू असलेला विराट, वन-डे क्रिकेटमध्ये विंडीजचे माजी दिग्गज फलंदाज सर व्हिवीअन रिचर्ड्स यांना मागे टाकण्याच्या वाटेवर असल्याचं मत वॉर्नने व्यक्त केलं आहे. तो India TV वाहिनीशी बोलत होता. गेल्या वर्षभरात विराट कोहली फलंदाजीमध्ये सर्वोत्तम खेळ करत आहे.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पराभव भारतासाठी धोक्याची घंटा !

“विराट कोहली उत्कृष्ट खेळाडू आहे. सर डॉन ब्रॅडमन हे सर्वोत्तम क्रिकेटपटू होते, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे त्यांच्यानंतर कोणता खेळाडू सर्वोत्तम आहे यावर चर्चा करणं थोडं कठीण आहे. माझ्या मते सर व्हिवीअन रिचर्ड्स हे मी पाहिलेल्या खेळाडूंमध्ये सर्वोत्तम होते, त्यांच्या तोडीचा एकही खेळाडू मला दिसला नाही. सध्या विराट कोहली रिचर्ड्स यांना मागे टाकून सर्वोत्तम वन-डे खेळाडू बनण्याच्या वाटेवर आहे.” शेन वॉर्नने विराट कोहलीचं कौतुक केलं.

“माझ्या कारकिर्दीत मी काही सामन्यांमध्ये विराट कोहलीला गोलंदाजी केली आहे. यामध्ये मी त्याला बाद करु शकलो की नाही हे मला आठवत नाही. मात्र आता ज्या पद्धतीने विराट फलंदाजी करतो आहे, हे पाहता तो नक्कीच रिचर्ड्स यांना मागे टाकेल. धावसंख्येचा पाठलाग करताना विराट ज्या पद्धतीने धावा करतो ते पाहण्यासारखं असतं.” शेन वॉर्न विराट कोहलीच्या फलंदाजीविषयी बोलत होता. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. विश्वचषकाआधी टीम इंडियाची ही अखेरची आंतरराष्ट्रीय वन-डे मालिका होती. यानंतर २३ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलमध्ये भारतीय खेळाडू सहभागी होतील. अखेरच्या सामन्यानंतर कर्णधार विराट कोहलीने, विश्वचषकासाठी भारतीय संघ जवळपास निश्चीत झाला असून एका जागेसाठी विचार सुरु असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे कोणत्या खेळाडूला विश्वचषकाचं तिकीट मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Story img Loader