आपल्या जादूई फिरकी गोलंदाजीच्या तालावर शेन वॉर्नने आपल्या कारकिर्दीत इंग्लंडच्या फलंदाजांना नाचवले. मात्र नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात सपाटून मार खाणाऱ्या इंग्लंड संघाला पुन्हा विजयपथावर नेण्याकरिता प्रशिक्षक होण्यासाठी तो उत्सुक आहे. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मनोधैर्य ढासळलेल्या इंग्लंडला सकारात्मक पातळीवर आणण्यासाठी कणखर आणि व्यावसायिक वृत्तीच्या प्रशिक्षकाची नितांत गरज आहे आणि त्यामुळेच या पदासाठी जगविख्यात फिरकीपटू शेन वॉर्नचे नाव प्रशिक्षकपदासाठी शर्यतीत आहे. ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून वॉर्नने या प्रस्तावासंदर्भात विचार करत असल्याचे स्पष्ट केले आहे. या वर्षी बांगलादेशमध्ये होणार असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघाचे फिरकी सल्लागार म्हणून वॉर्नची नियुक्ती करण्यात आली होती. लेहमन यांच्याबरोबरीने वॉर्न संघातील फिरकीपटूंना विशेष मार्गदर्शन करणार होते. इंग्लंडचे प्रशिक्षकपद खुणावत असले तरी माझे पहिले प्राधान्य ऑस्ट्रेलियाचा संघच असेल, असे सांगत वॉर्नने चाहत्यांच्या मनातील गोंधळ वाढवला आहे. दरम्यान, भारताचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा