Shane Warne’s will revealed: गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा महान लेग-स्पिनर शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या निधन झाले होते. थायलंडमध्ये कोह सामुई बेटावर व्हिलामध्ये राहत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला होता. व्यवस्थापकांना तो बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडला होता. अथक प्रयत्न करुनही वैद्यकीय पथकाने वॉर्नला वाचवता आले नाही. फिरकीच्या बळावर जगातील उत्कृष्ट फलदाजांना धडकी भरवणाऱ्या या दिग्गज क्रिकेटपटूने अनेक विश्वविक्रम प्रस्थापित केले होते.
किक्रेटच्या मैदानावर वर्चस्व गाजवणाऱ्या शेन वॉर्नचे खासगी आयुष्य नेहमीच चर्चेमध्ये राहिले. अनेक विवादांमध्ये त्याचा नावाचा समावेश होता. १९९५ मध्ये त्याने सिमोन कॅलाहानशी लग्न केले होते. त्यांच्या मुलांची नावे जॅक्सन, समर आणि ब्रूक अशी आहेत. पंधरा वर्षांनंतर २००५ साली शेन वॉर्नचा घटस्फोट झाला. पुढे अनेक अभिनेत्रींशी त्याचे नाव जोडण्यात आले होते. २०१० मध्ये तो ब्रिटीश अभिनेत्री एलिजाबेथ हर्लेला डेट करु लागला. २०१३ च्या आसपास ते दोघे वेगळे झाले असे म्हटले जाते.
नुकतंच शेन वॉर्नचं मृत्यूपत्र जगासमोर प्रसिद्ध करण्यात आलं. डेली मेलच्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियामधील सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या संपत्तीचे अवलोकन केले आहे. न्यायालयाने दिलेल्या माहितीमध्ये वॉर्नची संपत्ती तब्बल $२०,७११,०१२.२७ (भारतीय चलनामध्ये – एक अब्ज सातशे अकरा दशलक्ष रुपये) इतकी असल्याचे सांगितले आहे. मृत्यूपत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे या संपत्तीचे विभाजन करण्यात येणार आहे. विभाजनामध्ये त्याने पूर्वाश्रमीची पत्नी सिमोन आणि कथित प्रेयसी एलिजाबेथ यांना वगळले आहे. शेन वॉर्नने त्याची संपत्ती मुलगा-जॅक्सन आणि मुली-समर आणि ब्रूक यांच्यामध्ये समान भागामध्ये वाटली आहे. तिघांनाही संपत्तीमधील ३१ टक्के हिस्सा मिळणार आहे.
संपत्तीमधील उरलेल्या ७ टक्क्यांची मालकी वॉर्नच्या भावाकडे, जेसन वॉर्नकडे जाणार आहे. त्यामधील २ टक्क्यांवर जेसनची, तर ५ टक्क्यांवर जेसनच्या मुलांची (सेबेस्टियन आणि टायला) यांची समान मालकी असणार असणार आहे. याव्यतिरिक्त शेन वॉर्नची बीएमडब्ल्यू, मर्सिडीज गाडी आणि यमाहा मोटरबाईक जॅक्सनला मिळणार आहे. या गाड्यांची एकूण किंमत $३७५,५०० (अमेरिकन डॉलर्समध्ये) आहे. वॉर्नने घेतलेल्या कर्जाची परतफेड क्रेडिट कार्ड व घरांमार्फत करण्यात येणार आहे.