शेन वॉटसनच्या दीडशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या अ‍ॅशेस कसोटीत पहिल्या दिवशी ४ बाद ३०७ अशी दमदार मजल मारली.
या कसोटीपूर्वीच अ‍ॅशेस मालिका गमावलेल्या ऑस्ट्रेलियाने पाचव्या आणि अंतिम कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र डेव्हिड वॉर्नर केवळ ६ धावा करून तंबूत परतला. ख्रिस रॉजर्स आणि शेन वॉटसन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत डाव सावरला. १०० चेंडूत २३ धावांची संथ खेळी करून रॉजर्स बाद झाला. जेम्स अँडरसनने मायकेल क्लार्कला ७ धावांवर त्रिफळाचीत करत ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले. मात्र यानंतर वॉटसनला साथ मिळाली ती स्टीव्हन स्मिथची. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १४५ धावांची भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान वॉटसनने आपले शतक पूर्ण केले. द्विशतकाकडे कूच करणाऱ्या वॉटसनला स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले. वॉटसनने २४७ चेंडूत २५ चौकार आणि एका षटकारासह १७६ धावांची मॅरेथॉन खेळी केली.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्टीव्हन स्मिथ ६६ तर पीटर सिडल १८ धावांवर खेळत आहेत. इंग्लंडने या सामन्यात ख्रिस वोक्स आणि सिमोन केरिगनला पदार्पणाची संधी दिली तर ऑस्ट्रेलियासाठी मिचेल स्टार्कने पुनरागमन केले तर जेम्स फॉल्कनरने कसोटी पदार्पण केले.

Story img Loader