मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोल काळे यांची वर्णी लागलेली आहे. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत संदीप पाटील विरुद्ध अमोल काळे असा सामाना रंगला होता. मात्र अमोल काळे यांनी ही अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. शरद पवार- आशिष शेलार पॅनलकडून ते उभे होते.
मागील अनेक दिवसांपासून एमसीए अध्यक्षपादाच्या निवडणुकीची चर्चा होती. या निवडणुकीत राजकीय विरोधक असलेले भाजपाचे नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र आले होते. आज (२० ऑक्टोबर) पार पडलेल्या निवडणुकीत एकूण ३८० मतदार मतदानाचा हक्क बजावणार होते. या निवडणुकीत पवार-शेलार पॅनेलचे उमेदवार अमोल काळे यांचा विजय झाला आहे.
हेही वाचा >>> T20 World Cup 2022: भारत पाकिस्तान सामन्यावर निसर्गाचं संकट; रद्द झाल्यास लाखो कोटींचा फटका
शरद पवार यांच्या पॅनलने सुरुवातीला अध्यक्षपदासाठी संदीप पाटील यांना पाठिंबा दिला होता. मात्र, आशिष शेलार यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर शरद पवारांनी निर्णय बदलला. शरद पवार आणि आशिष शेलार पॅनल एकत्र आले. आशिष शेलार बीसीसीआय खजिनदार झाल्याने त्यांच्याजागी अमोल काळे यांना अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली होती.
हेही वाचा >>> T20 World Cup 2022: पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी टीम इंडिया मेलबर्नमध्ये दाखल, पाहा व्हिडिओ
कोणाला किती मतं?
अमोल काळे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे संदीप पाटील हे माजी क्रिकेटपटू आहेत. या निवडणुकीत अमोल काळे यांना १८३ मतं मिळाली तर संदीप पाटलांना एकूण १५८ मतं मिळाली. म्हणजेच अमोल काळे यांचा २३ मतांनी विजय झाला आहे. निवडणुकीत ३०० पेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले होते.