आयपीएल भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सुचविलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीत समाविष्ट असलेल्या निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांचे प्रभारी अध्यक्ष शिवलाल यादव यांच्याशी घनिष्ठ संबंध आहेत, असे मत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहे. याचप्रमाणे चौकशी समितीवर भारताचा माजी कर्णधार रवी शास्त्री यांच्या समावेशामागेही हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
‘‘जर पटेल हे बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष शिवलाल यादव यांच्याशी संबंधित असतील, तर त्यांनी ते स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. परंतु तसे काही नसल्याचे बीसीसीआयने स्पष्टीकरण द्यावे आणि अशा प्रकारच्या चर्चा थांबवाव्यात,’’ असे पवार यांनी सांगितले.
रविवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या तातडीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती जे. एन. पटेल, शास्त्री आणि सीबीआयचे माजी संचालक आर. के. राघवन यांचा समावेश असलेल्या त्रिसदस्यीय चौकशी समितीची नावे निश्चित केली. ही नावे आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणाचा खटला चालू असलेल्या सर्वोच्च न्यायालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहेत. या संदर्भातील पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.
आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी १६ एप्रिलला सुनावणी झाली होती. यात नि:पक्षपाती चौकशीसाठी नावे सुचवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला दिले होते. बीसीसीआयने सुचवलेल्या नावांवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालय शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
‘‘मी पटेल यांना व्यक्तिश: ओळखत नाही. परंतु या वृत्तात तथ्य असेल तर त्यांनी ते स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे,’’ असे पवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाल़े, ‘‘सकाळी माझ्याशी दूरध्वनीवरून एका बीसीसीआयच्या सदस्याने संवाद साधला. जे. एन. पटेल हे अतिशय चांगले न्यायमूर्ती होते. त्यांनी अनेक कठीण जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत, असे त्या व्यक्तीने मला सांगितले. याचप्रमाणे आंध्र प्रदेशहून आणखी एका व्यक्तीने मला दूरध्वनी केला होता. शिवलाल यादव आणि पटेल हे जवळचे नातलग असल्याचे त्याने मला सांगितले. हे नाते मेहुणा किंवा तत्सम असल्याचे तो काहीतरी म्हणाला, मला आठवत नाही.’’
‘‘जर या वृत्तात सत्यता असेल तर नागरिकांनीच निर्णय घ्यावा. मला न्यायमूर्ती पटेल यांच्या प्रतिष्ठेची जाण आहे. अशा प्रकारे काही चुकीचे ते घडू देणार नाहीत,’’ असे पवार यांनी सांगितले.
आधी खेळाडू आणि आता समालोचनाकडे वळलेल्या शास्त्रीचा बीसीसीआयशी आर्थिक करार आहे. या पाश्र्वभूमीवर शास्त्रीच्या नियुक्तीमागेसुद्धा हितसंबंध गुंतले आहेत, असा आरोप आयसीसीचे माजी अध्यक्ष पवार यांनी केला आहे. ‘‘रवी शास्त्री हा चांगला खेळाडू आहे. मी २००५ ते २००८ दरम्यान बीसीसीआयचा अध्यक्ष होतो, तेव्हा आम्ही शास्त्री आणि गावस्कर यांना करारबद्ध केले होते. परंतु आता कुणीही असे म्हणू शकते की, बीसीसीआयशी आर्थिक करारबद्ध असलेली व्यक्ती अध्यक्षाची चौकशी करणाऱ्या समितीचा सदस्य कशी काय असू शकते?’’ असा सवाल पवार यांनी केला.
‘‘शास्त्रीच्या प्रामाणिकपणाबाबत मी संशय घेत नाही. परंतु हा सवाल कुणीही विचारू शकते. म्हणूनच अशा संवेदनशील व्यक्तीने चौकशी समितीपासून दूर राहावे,’’ असे पवार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीसीसीआयच्या तातडीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत काय घडले, ते मी उघडपणे सांगू शकणार नाही. सर्वसामान्य लोकांमध्ये बीसीसीआयची प्रतीमा सुधारण्याच्या हेतूने मी त्या बैठकीला गेलो होतो. परंतु बैठकीत जे काही घडले, त्यामुळे माझा भ्रमनिरास झाला आहे, एवढेच मी सांगेन.
-शशांक मनोहर, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष