राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपमधील वाढत्या जवळिकीबद्दल चर्चा सुरू असतानाच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप अशी युती झाली आहे. शिवसेनेने ऐनवेळी पाठ फिरवल्याचा आरोप करून याचे खापर भाजपने शिवसेनेवर फोडले आहे. तसेच सेनेने कॉंग्रेसबरोबर युती केल्याचा आरोपही भाजपने केला आहे. दरम्यान, देशातील सर्वात श्रीमंत म्हणून गणना होणाऱ्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवार यांना प्रथमच आव्हान देण्याचा विरोधी गटाकडमून प्रयत्न झाला आहे.
मुंबई क्रिकेट असोसिएशनची १७ जून रोजी द्वैवार्षिक निवडणूक होत आहे. मंगळवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. तेव्हा ही राजकीय गणिते स्पष्ट झाली. एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष शरद पवार यांना शिक्षणसम्राट डी. वाय. पाटील यांचे पुत्र विजय पाटील यांनी आव्हान दिले आहे. पवार यांच्या बाळ म्हाडदळकर गटाकडमून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार हे निवडणूक लढवीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीनेच आपण या गटाकडून अर्ज भरल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले आहे. एकीकडे राष्ट्रवादीशी आमचा काहीही समझोता नाही वा पडद्याआडून हातमिळवणी केलेली नाही, असा दावा भाजप नेते करीत असले तरी खेळाच्या मैदानात मुंबई भाजपचे अध्यक्ष थेट शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधून लढत आहेत. भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढविण्याचे ठरविले होते. मुख्यमंत्र्यांकडे झालेल्या बैठकीत तसा निर्णयही झाला होता; पण शिवसेनेने ऐनवेळी पाठ फिरवल्याचा आरोप भाजपचे आशीष शेलार यांनी केला. राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याबद्दल टीका होऊ लागताच हे सारे खापर शेलार यांनी शिवसेनेवर फोडले आहे. शिवसेनेने विजय पाटील यांना पाठिंबा देऊन एक प्रकारे काँग्रेसबरोबर हातमिळवणी केल्याचा आरोपही शेलार यांनी केला. शिवसेनेने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय पाटील यांना पाठिंबा दिला आहे. म्हणजेच शिवसेनेने पवार यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. हॉटेलमध्ये मराठी पदार्थ मिळावेत इथपासून साऱ्याच विषयांमध्ये अधिक रस घेणारे रिपब्लिकन पक्षाचे खासदार रामदास आठवले आता क्रिकेटच्या रिंगणातही उतरले आहेत. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे लोकप्रतिनिधीही रिंगणात आहेत.
शरद पवारांना बऱ्याच वर्षांनंतर आव्हान
अजित वाडेकर यांचा २००० साली पराभव करून ‘एमसीए’च्या राजकारणात पवार यांनी प्रवेश केल्यानंतर प्रत्येक वेळी ते बिनविरोध निवडून आले. २०११ पर्यंत त्यांची सलग सत्ता होती; परंतु तांत्रिक कारणास्तव निवडणूक लढवू न शकल्यामुळे २०११ मध्ये त्यांनी विलासराव देशमुख यांना अध्यक्षपदावर निवडून आणले. त्यानंतर २०१३ मध्ये पुन्हा ते अध्यक्षपदावर बिनविरोध विराजमान झाले. तेव्हा प्रतिस्पर्धी उमेदवार गोपीनाथ मुंडे यांचा अर्ज तांत्रिक कारणास्तव रद्दबातल ठरला होता. त्यामुळे जर विजय पाटील यांनी अध्यक्षपदाची उमेदवारी कायम राखली तर पवार यांच्यापुढे बऱ्याच वर्षांनंतर आव्हान उभे राहणार आहे.