Ranji Trophy Quarterfinal Mumbai vs Haryana Updates in Marathi: शार्दुल ठाकूर रणजी ट्रॉफी २०२४-२०२५मध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीमुळे चर्चेत आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीतही शार्दुलने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आता पुन्हा एकदा शार्दुल ठाकूरच्या भेदक गोलंदाजीची झलक पाहायला मिळाली. मुंबई संघाचा रणजी ट्रॉफीमधील उपांत्यपूर्व फेरीचा सामना हरियाणाविरूद्ध खेळवला जात आहे. या सामन्यात शार्दुलने भेदक गोलंदाजी करत ६ विकेट्स आपल्या नावे केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करताना ३१५ धावा केल्या. मुंबईची टॉप फलंदाजी फळी अपयशी ठरल्यानंतर अजिंक्य रहाणे ३१ धावा, शम्स मुलानी ९१ धावा आणि तनुष कोटियनच्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने ३०० धावांचा टप्पा पार केला. यानंतर प्रत्युत्तरात हरियाणाचा कर्णधार अंकित कुमारने १३६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण त्याच्याशिवाय इतर कोणत्याच फलंदाजाला मुंबईच्या गोलंदाजांनी टिकू दिले नाही.

उजव्या हाताच्या अष्टपैलू शार्दुल ठाकूरने हरियाणाविरुद्ध एकट्याने ६ फलंदाजांना माघारी धाडलं. ठाकूरने १८.५ षटकांत केवळ ५८ धावा देत ६ विकेट घेतले. मोठी गोष्ट म्हणजे शार्दुल ठाकूरने अतिशय भेदक गोलंदाजी केली. त्याने १८.५ षटकांत ८२ चेंडूत एकही धाव दिली नाही.

शार्दुल ठाकूर हा हरियाणाविरुद्ध लक्ष्य दलालचा पहिला बळी ठरला. यानंतर त्याने रोहित प्रमोद शर्माला बाद केलं. अवघ्या काही वेळातच त्याने हरियाणाच्या खालची फळी पूर्णपणे उद्ध्वस्त केली. या खेळाडूने अनुत ठकराल, जयंत यादव, अंशुल कंबोज आणि अजित चहल यांनाही बाद केले. ठाकूरने नेहमीच रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. या सामन्यातही एकेकाळी हरियाणा मोठ्या आघाडीच्या मार्गावर होता, पण ठाकूरने शानदार गोलंदाजी करत मुंबईला १४ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.

शार्दुल ठाकूरने या रणजी मोसमात आतापर्यंत ३२ विकेट घेतल्या आहेत. या मोसमात त्याने प्रथमच एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. एवढेच नाही तर ठाकूरने बॅटनेही कमालीची कामगिरी केली आहे. या खेळाडूने ४४ च्या सरासरीने ३९६ धावा केल्या आहेत ज्यात ३ अर्धशतकं आणि एक शतक आहे.

सध्या मुंबईचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करत असून अजिंक्य रहाणे ८८ धावा आणि शिवम दुबे ३० धावांवर खेळत आहे. तर सलामीवीर आयुष म्हात्रेने ३४ धावांची, सिद्धेश लाडने ४३ धावांची खेळी केली. तर भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव ज्याची बॅट गेले काही आंतरराष्ट्रीय सामने शांत होती, त्यालाही अखेरीस सूर गवसला आणि त्याने रणजी सामन्यात ८६ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ७० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यासह मुंबईचा संघ आता २९२ धावांनी पुढे आहे.