शार्दूल ठाकूरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने दिल्लीला १६६ धावांतच गुंडाळले. त्यानंतर दुसऱ्या डावात दमदार वाटचाल करत मुंबईने दुसऱ्या दिवशी रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यावर पकड घट्ट केली आहे.
मुंबईचा पहिला डाव १५६ धावांत गुंडाळल्यानंतर दिल्लीने १ बाद २०वरून पुढे खेळायला सुरुवात केली. गौतम गंभीर कालच्या धावसंख्येत एकाचीही भर न घालता तंबूत परतला. विल्कीन मोटाने त्याला पायचीत केले. शिवम शर्माला ३० धावांवर बाद करत मोटाने मुंबईला आणखी एक यश मिळवून दिले. अनुभवी फलंदाज वीरेंद्र सेहवाग अर्धशतकाकडे वाटचाल करत असताना शार्दूल ठाकूरच्या थेट फेकीने त्याला तंबूत परतावे लागले. त्याने ९ चौकारांसह ४९ धावा केल्या. मिथुन मन्हासला भोपळाही फोडता आला नाही. सेहवाग बाद झाल्यानंतर शार्दूलने नियमित अंतरात दिल्लीच्या फलंदाजांना माघारी धाडले. त्यामुळे त्यांचा डाव १६६ धावांतच संपुष्टात आला. त्यांना १० धावांची नाममात्र आघाडी मिळाली. शार्दूलने ५४ धावांत ५ बळी घेतले. बलविंदर संधू आणि विल्कीन मोटा यांनी प्रत्येकी २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. मुंबईने दुसऱ्या डावात १ बाद ८७ अशी मजल मारली आहे. अखिल हेरवाडकर ५२ तर श्रेयस अय्यर १२ धावांवर खेळत आहेत. मुंबईकडे ७७ धावांची आघाडी आहे.
संक्षिप्त धावफलक
मुंबई : १५६ व १ बाद ८७ (अखिल हेरवाडकर खेळत आहे ५२) वि. दिल्ली : पहिला डाव १६६ (वीरेंद्र सेहवाग ४९; शार्दूल ठाकूर ५/५४)