भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरने इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली आणि अवघ्या ३१ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ओली रॉबिन्सनला षटकार ठोकून आपले अर्धशतकही पूर्ण केले. या डावात शार्दुलने ३६ चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी खेळली. कसोटी क्रिकेटमधील हे त्याचे दुसरे अर्धशतक होते. शार्दुलच्या खेळीवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. आक्रमक फलंदाजीचा बादशाह वीरेंद्र सेहवागने ”शार्दूल ठाकूरच्या वॅगन व्हीलबद्दल बोलावे लागेल असे कधी वाटले नव्हते”, असे म्हटले.
सेहवागचा मोडला विक्रम
शार्दुल भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. याआधी वीरेंद्र सेहवाग भारतासाठी कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर होता, त्याने २००८मध्ये इंग्लंडविरुद्ध ३२ चेंडूत ही कामगिरी केली होती. आता शार्दुलने इंग्लंडविरुद्ध ३१ चेंडूत अर्धशतक झळकावून दुसरे स्थान मिळवले. कपिल देव यांनी १९८२ साली पाकिस्तानविरुद्ध भारतासाठी कसोटीत सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला.
हेही वाचा – ENG vs IND : उमेश यादवचा फटका बघून गावसकरांना आठवला मुंबईचा ‘बनाटी शॉट’!
शार्दुल ठाकूरच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात १९१ धावांचा टप्पा गाठला. कर्णधार विराट कोहलीनेही ५० धावांचे योगदान दिले, रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा हे सर्व फलंदाज अपयशी ठरले. या सर्वांनी सुमार फलंदाजी केली.
भारतासाठी कसोटीत सर्वात जलद अर्धशतक करणारे फलंदाज
- ३० चेंडू – कपिल देव विरुद्ध पाकिस्तान, १९८२
- ३१ चेंडू – शार्दुल ठाकूर विरुद्ध इंग्लंड, २०२१
- ३२ चेंडू – वीरेंद्र सेहवाग विरुद्ध इंग्लंड, २००८
- ३३ चेंडू – कपिल देव विरुद्ध पाकिस्तान, १९७८
- ३३ चेंडू – कपिल देव विरुद्ध इंग्लंड, १९८२