Shardul Thakur injured his shoulder while practicing in the nets : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे. वास्तविक, अष्टपैलू शार्दुल ठाकूर केपटाऊनमध्ये सराव सत्रादरम्यान जखमी झाला. त्याच्या खांद्याला दुखापत झाली असून, त्यानंतर त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, शनिवारी सराव सत्रात फलंदाजी करताना शार्दुलच्या खांद्यावर चेंडू लागला, त्यानंतर त्याच्या दुखापतीचे मूल्यांकन करण्यासाठी त्याला स्कॅनसाठी नेण्यात आले.
शार्दुल ठाकुर दुसऱ्या कसोटीत खेळणे साशंक –
अहवालानुसार, शार्दुल ठाकूरची दुखापत गंभीर असू शकते आणि ३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत खेळणे त्याच्यासाठी कठीण आहे. शार्दुलला नेटमध्ये दुखापत झाली तेव्हा तो अस्वस्थ होता. फलंदाजी करताना दुखापत झाल्यानंतर शार्दुलने गोलंदाजीही केली, मात्र गोलंदाजी करताना तो अस्वस्थ दिसत होता. शार्दुल ठाकूर हा सराव सत्रात प्रवेश करणारा पहिला खेळाडू होता. सुमारे १५ मिनिटांच्या सत्रानंतर ठाकूरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली.
शार्दुलच्या जागी कोण खेळणार?
शार्दुल ठाकूरची पहिल्या कसोटीतील कामगिरी निराशाजनक होती. त्याने १९ षटके गोलंदाजी करताना १०१ धावा दिल्या. या दरम्यान त्याला फक्त एक विकेट मिळाली. शार्दुलने पहिल्या डावात २४ तर दुसऱ्या डावात केवळ २ धावांचे योगदान दिले होते. शार्दुल केपटाऊन कसोटीत खेळला नाही, तर त्याच्या जागी रवींद्र जडेजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. मात्र, जडेजाचे खेळणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल. कारण जडेजा दुखापतीमुळे पहिल्या कसोटीत खेळला नव्हता.
हेही वाचा – Rishabh Pant : कार अपघातानंतर एका वर्षाने पुनरागमनासाठी ऋषभ सज्ज, दिल्ली कॅपिटल्सने शेअर केला भावनिक VIDEO
दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा, केएस भरत (यष्टीरक्षक), अभिमन्यू ईश्वरन, आवेश खान.