आठवडय़ाची मुलाखत : शार्दूल ठाकूर, वेगवान गोलंदाज
गोलंदाजीमध्ये झालेल्या आमूलाग्र बदलाचे श्रेय वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने मुंबईच्या वरिष्ठ खेळाडूंच्या मार्गदर्शनाला दिले आहे. शार्दूलची आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये शार्दूल रणजी स्पर्धेत सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. भारतीय संघातील निवडीचा त्याला आनंद झाला असला तरी त्याला जल्लोश मात्र करता आला नाही, असे शार्दुलने सांगितले. या निमित्ताने शार्दूलशी केलेली हा खास बातचीत-
* वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल काय वाटते?
भारतीय संघात खेळण्याचे माझेही स्वप्न होते, आता ते सत्यात उतरताना दिसत आहे. या निवडीचा मला नक्कीच आनंद आहे. पण दोन आठवडय़ांपूर्वीच माझे मामा वारले. त्यामुळे या निवडीबाबत जास्त जल्लोश झाला नाही. आमच्या घरात बरेच खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना या निर्णयामुळे फार आनंद झाला आहे. पण आता माझ्यावरील जबाबदारी वाढली आहे आणि त्याची मला जाणीवही आहे. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना कधीही मी निराश करणार नाही.
* तू जेव्हा रणजीमध्ये पदार्पण केले, तेव्हा तुझी गोलंदाजी अपरिपक्व होती, पण त्यामध्ये आता आमूलाग्र बदल झाला आहे, तो कशामुळे झाला असे वाटते?
मी जेव्हा पदार्पण केले तेव्हा माझ्या गोलंदाजीला चांगला वेग होता. पण योग्य टप्पा आणि दिशा मला मिळत नव्हती. कामगिरीमध्ये सातत्य नव्हते. तेव्हा संघातील वरिष्ठ खेळाडूंकडून मला चांगले मार्गदर्शन मिळाले. सचिन तेंडुलकर सरांनी मला अमूल्य मार्गदर्शन केले. त्याबरोबर संघात झहीर खान आणि अजित आगरकर हे दोन अव्वल वेगवान गोलंदाज होते. त्यांनीही माझ्या गोलंदाजीवर मेहनत घेतली. त्याचबरोबर अभिषेक नायरनेही मला प्रोत्साहन दिले. या सर्वाच्या मार्गदर्शनानंतर माझी गोलंदाजी अधिक परिपक्व झाली. वेगाबरोबरच चेंडूचे टप्पे आणि दिशा योग्य होत गेली. त्यामुळेच गेल्या २-३ वर्षांमध्ये माझी गोलंदाजी अधिक भेदक झाली आणि त्यामुळेच मला भारतीय संघात स्थान मिळाले.
* वेगवान गोलंदाजी करण्यासाठी कशावर अधिक भर देतोस?
वेगवान गोलंदाजांना दुखापती लवकर होतात, असे म्हटले जाते. त्यामुळे तंदुरुस्तीवर मी अधिक भर देतो. त्यासाठी गेल्या तीन वर्षांमध्ये मी दहा किलो वजन कमी केले आहे. त्याचबरोबर रोज धावण्याचा व्यायाम करतो. सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांमध्ये मी तंदुरुस्ती वाढवण्यासाठी व्यायाम करतो. जेव्हा स्पर्धाचा मोसम नसतो, तेव्हाचा काळ खेळाडूंसाठी महत्त्वाचा असतो, असे मला वाटते. कारण या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या कामगिरी आणि तंदुरुस्तीबाबत विचार करण्याचा अधिक वेळ मिळतो.
* वेस्ट इंडिजच्या दौऱ्याचा कशा प्रकारे अभ्यास सुरू करणार आहे?
सध्याच्या घडीला मी तंदुरुस्तीवर अधिक भर देत आहे. पण काही दिवसांनी मी वेस्ट इंडिजमधील खेळपट्टय़ांचा आणि खेळाडूंचा अभ्यास करणार आहे. आतापर्यंत मी वेस्ट इंडिजला एकदाही गेलो नाही, त्यामुळे तिथल्या वातावरणाचा आणि खेळपट्टय़ांचा मला अंदाज नाही. पण वरिष्ठ खेळाडूंकडून मी ही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. या दौऱ्यात माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठेवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन.