Shardul Thakur Reaction IND vs WI ODI Series: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी खेळला गेला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर २०० धावांनी मोठा विजय मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्याच्या मालिकेवरही आपले नाव कोरले. या टीम इंडियाच्या विजयात अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरने ४ विकेट्स घेत महत्त्वाची भूमिका बजावली. फलंदाजीत तो फार काही करू शकला नसला, तरी मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. या कामगिरीच्या जोरावर शार्दुल ठाकूरने भारताच्या विश्वचषक संघात आपल्या निवडीसाठी दावा मजबूत केला आहे. या सामन्यानंतर शार्दुल ठाकुरने प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शार्दुल ठाकूरनेही आपली भूमिका संघासाठी महत्त्वाची का ठरते हे सांगितले. तथापि, सीम-बॉलिंग अष्टपैलू खेळाडूने आपले स्थान निश्चित करण्यापेक्षा संघासाठी ‘योगदान’ करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. एकदिवसीय विश्वचषक ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळवला जाणार आहे. संघ व्यवस्थापनाला मार्की स्पर्धेपूर्वी खेळाडूंना त्यांचे स्थान निश्चित करण्याची संधी द्यायची आहे.

मी माझ्या करिअरमध्ये फक्त अनुभव जोडत आहे –

तिसर्‍या वनडेनंतर शार्दुल ठाकूर म्हणाला, “या मालिकेत आठ विकेट्स मिळाल्याने मी खूश आहे. क्रिकेटपटू म्हणून आपण वर्षानुवर्षे या संधीची वाट पाहतो. कधी तुम्ही परफॉर्म करता, तर कधी करत नाही. मी खेळत असलेली प्रत्येक मालिका नेहमीच माझा आत्मविश्वास वाढवते. कारण मी माझ्या कारकिर्दीत फक्त अनुभव जोडत असतो. माझी जागा पक्की करण्यासाठी मला खेळावे लागेल, असा मला कधीच विचार आला नाही. कारण मी त्या मानसिकतेने खेळू शकत नाही आणि मी तसा खेळाडू नाही.”

हेही वाचा – IND vs WI: “आलिशान नकोत, किमान मूलभूत सुविधा तरी…”; हार्दिक पांड्याने वेस्ट इंडिज बोर्डावर व्यक्त केली नाराजी

दोन वर्षांत फक्त एका वनडे मालिकेत निवड झाली नाही –

शार्दुल ठाकूर म्हणाला, “माझी विश्वचषकाच्या संघात निवड झाली नाही, तर तो त्याचा निर्णय असेल. मी याबद्दल फार काही करू शकत नाही. मी नेहमी संघासाठी कामगिरी करण्याचा आणि सामन्यातील परिस्थितीनुसार खेळण्याचा प्रयत्न करतो. ऑलराउंडर म्हणून खालच्या क्रमाकावर फलंदाजी करणे ही माझी भूमिका महत्त्वाची आहे. मी फक्त एक वनडे मालिका खेळलो नाही. मी भारतातील श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेचा भाग नव्हतो, पण त्याशिवाय मी दोन वर्षांत सर्व मालिका खेळलो आहे. संघाला माझ्याकडून अपेक्षा आहेत. त्यामुळेच माझी निवड झाली आहे. जेव्हा-जेव्हा मला संधी मिळते, तेव्हा मला वाटते की संघाचा माझ्यावर विश्वास आहे.”

हेही वाचा – IND vs WI: “वेगवेगळ्या गोलंदाजांसाठी माझ्या…”; तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर संजू सॅमसनची प्रतिक्रिया

विश्वचषकापूर्वीचा प्रत्येक सामना महत्त्वाचा –

शार्दुल ठाकूर म्हणाला, “गेल्या काही वर्षांत आम्ही खालच्या फळीपर्यंत फलंदाजी ठेवली आहे. अष्टपैलू खेळाडू असल्याने माझी भूमिका महत्त्वाची आहे. मी माझे सर्वोत्कृष्ट योगदान देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरुन मी माझे प्रयत्न दिले आहेत याची खात्री देता येईल. विश्वचषकापूर्वी प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. प्रत्येक विभागात तुम्हाला स्वतःचे मूल्यांकन करावे लागेल. संघ व्यवस्थापनाचीही नजर तुमच्यावर असेल. वैयक्तिकरित्याही प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्त्वाचा असतो.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shardul thakur said if i am not selected in the wc squad it will be his decision vbm