Shardul Thakur scored his maiden first class century : सध्या भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफीचे उपांत्य फेरीचे सामने खेळले जात आहेत. रणजी ट्रॉफी २०२४ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबई आणि तामिळनाडूचे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात शार्दुल ठाकूरने मुंबईच्या पहिल्या डावात अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याने एक असा पराक्रम केला, जो त्याने त्याच्या कारकिर्दीत यापूर्वी कधीही केला नव्हता. शार्दुल ठाकुरने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले आहे.
शार्दुल ठाकूरचा रणजी ट्रॉफीतील मोठा पराक्रम –
अष्टपैलू शार्दुल ठाकूरने रणजी ट्रॉफी २०२४ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावले. शार्दुल ठाकूरने या सामन्याच्या पहिल्या डावात अवघ्या ८९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे शार्दुल ठाकूरच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील हे पहिले शतक आहे. शार्दुल ठाकूरने या डावात १०५ चेंडूत १०९ धावा केल्या. या दरम्यान त्याच्या बॅटमधून १३ चौकार आणि ४ षटकार पाहिला मिळाले.
मुंबई संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले –
या सामन्यात तामिळनाडू संघाने पहिल्या डावात केवळ १४६ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर देताना मुंबई संघाने एकवेळ १०६ धावांवर ७ विकेट गमावल्या होत्या. यानंतर शार्दुल ठाकूर मैदानात आला आणि त्याने संघाचे सामन्यात कमबॅक केले. त्याने हार्दिक तामोरेसह आठव्या विकेटसाठी १०५ धावांची शतकी भागीदारी करत संघाला आघाडी मिळवून दिली. मुंबई संघाने दुसरा दिवस अखेर १०० षटकांत ९ बाद ३५३ धावा केल्या आहेत. सध्या तुषार देशपांडे आणि तुषार कोटियन अनुक्रमे १७आणि ७४ धावांवर नाबाद आहेत. त्याचबरोबर तामिळाडूकडून साई किशोरने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – VIDEO : ‘या’ खेळाडूच्या डोक्याला कारकिर्दीत १३व्यांदा लागला चेंडू, रिटायर्ड हर्ट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला
श्रेयस-अजिंक्य अपयशी –
शार्दुल ठाकूरने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतही त्याला संधी मिळालेली नाही. टीम इंडियातून बाहेर असलेले श्रेयस अय्यर आणि अजिंक्य रहाणे या डावात फ्लॉप ठरले. श्रेयस अय्यरने केवळ ३ धावा केल्या. तर अजिंक्य रहाणे १९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, गेल्या सामन्यात द्विशतक झळकावणाऱ्या मुशीर खानने या डावात अर्धशतक झळकावले. त्याने १३१ चेंडूत ५५ धावा करून तो बाद झाला.