मुंबईचा संघ दुसऱ्या रणजी सामन्यातही अडचणीत सापडला आहे. शार्दूल ठाकूरने सहा बळी मिळवत रेल्वेचा पहिला डाव २४२ धावांपर्यंत रोखला. पण मुंबईच्या फलंदाजांना याचा फायदा घेता आला नाही. तिसऱ्या दिवसअखेर मुंबईची ३ बाद २४ अशी अवस्था असून त्यांना किमान पहिल्या डावात आघाडी मिळवण्यासाठी चौथ्या दिवशी २१९ धावा कराव्या लागणार आहेत.
पहिल्या दिवसाच्या २ बाद २५वरून पुढे खेळताना दुसऱ्या दिवशी पावसामुळे एकही चेंडू टाकला गेला नाही. तिसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरलेल्या रेल्वेच्या संघाला शार्दूलने भेदक मारा करत चांगलेच जखडून ठेवले, पण त्याला अन्य गोलंदाजांकडून अपेक्षित साथ लाभली नाही. रेल्वेचा कर्णधार महेश रावत आणि अर्णब नंदी यांनी अर्धशतकी खेळी साकारत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. रावतने ९ चौकारांच्या जोरावर ६८, तर नंदीने ९ चौकारांच्या जोरावर ६१ धावांची खेळी साकारली. शार्दूलने ५९ धावांमध्ये सहा बळी मिळवले.
रेल्वेच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईला चांगली सुरुवात करता आली नाही. या सामन्यात संधी मिळालेल्या सलामीवीर सुशांत मराठेला (५) मोठी खेळी साकारता आली नाही. ब्रविश शेट्टी आणि आदित्य तरे यांना तर भोपळाही फोडता आला नाही. संघात पुनरागमन केलेला डावखुरा फलंदाज हिकेन शाहने (खेळत आहे १७) संघाची पडझड थांबवली.
संक्षिप्त धावफलक
रेल्वे (पहिला डाव) : ७४ षटकांत सर्व बाद २४२
(महेश रावत ६८, अर्णब नंदी ६१; शार्दूल ठाकूर ६/५९) वि. मुंबई (पहिला डाव) : १५ षटकांत ३ बाद २४ (हिकेन शाह खेळत आहे १७; अनुरीत सिंग १/४).