Ranji Trophy 2025 Shardul Thakur take hat-trick : भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने गुरुवारी मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमीमध्ये रणजी ट्रॉफी २०२४-२५ सामन्याच्या पहिल्या दिवशी मेघालयविरुद्ध हॅटट्रिक घेत कमाल केली. पाहुण्या संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या मुंबईसाठी गोलंदाजीची सलामी देताना ठाकूरने मेघालयचा सलामीवीर निशांत चक्रवर्तीला पहिल्याच षटकात एकही धाव न देता पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर तिसऱ्याच षटकात हॅट्ट्रिक घेत खळबळ उडवून दिली.
मेघालयने केला नकोसा विक्रम –
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एखाद्या संघाच्या पहिल्या ६ विकेट्स सर्वात कमी धावसंख्येवर पडण्याच्या बाबतीत मेघालय संघ आता या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत पहिल्या स्थानावर एमसीसी संघ आहे, ज्याने १८७२ मध्ये काउंटी हंगामात शून्य धावांवर आपले पहिले सहा विकेट्स गमावले होते, त्यानंतर या यादीत तिसऱ्या स्थानावर ऑक्सफर्ड विद्यापीठाचा संघ आहे, ज्याने १८६७ मध्ये तीन धावांवर पहिल्या ६ विकेट्स गमावल्या होत्या.
मेघालयने ६ फलंदाज अवघ्या २ धावांत गमावले –
रणजी ट्रॉफी २०२५ च्या सातव्या फेरीची सुरुवात उत्कृष्ट झाली. एकीकडे विराट कोहलीने दिल्लीच्या मैदानावर चाहत्यांचा महापूर आणला, तर शार्दुल ठाकूरने मुंबईत हॅट्ट्रिक घेत खळबळ उडवून दिली. मेघालयविरुद्ध मुंबईचा शेवटचा सामना सुरू आहे. शार्दुल ठाकूरने सामन्याच्या सुरुवातीलाच हॅट्ट्रिक घेत मेघालय संघाला गुडघे टेकण्यास भाग पाडले. त्याच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर मेघालयने आपले ६ फलंदाज अवघ्या २ धावांत गमावले.
शार्दुल ठाकुरने या फलंदाजांना दाखवला तंबूचा रस्ता –
शार्दुल ठाकुरने षटकाच्या शेवटच्या तीन चेंडूंवर बी अनिरुद्ध, सुमित कुमार आणि जसकिरत यांना शून्यावर बाद करून ठाकूरने प्रथम श्रेणीची हॅट्ट्रिक साधली. ३३ वर्षीय ठाकूरने गेल्या सामन्यात मुंबईसाठी शानदार शतक झळकावले होते, ज्यामध्ये गतविजेत्या संघाला त्याच मैदानावर गेल्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीरकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे त्यांची बाद फेरीत जाण्याची शक्यता संपुष्टात आली होती. मात्र, शार्दुल ठाकुरने पुन्हा एकदा चमकदार कामगिरीत टीम इंडियात पुनरागमनासाठी भक्कम दावेदारी केली आहे.
शार्दुल मुंबईसाठी हॅट्ट्रिक घेणारा पाचवा गोलंदाज –
शार्दुल मुंबईसाठी हॅट्ट्रिक घेणारा पाचवा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी जहांगीर बेहरामजी खोत, उमेश नारायण कुलकर्णी, अब्दुल मुसा भोय इस्माईल आणि रॉयस्टन हेरॉल्ड डायस यांनी ही कामगिरी केली आहे. एकेकाळी मेघालयने दोन धावांत सहा विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर खालच्या क्रमवारीत प्रिंगसंग संगमाच्या १९ धावा, कर्णधार आकाश चौधरीच्या १६ धावा, अनिश चरकच्या १७ धावा आणि हिमन फुकनच्या २८ धावांच्या जोरावर मेघालय संघाला ८६ धावांपर्यंत मजल मारता आली.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी मिळू शकते संधी –
शार्दुल ठाकूर सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. याआधी, जम्मू-काश्मीरविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने पहिल्या डावात ५७ चेंडूत ५१ धावा आणि दुसऱ्या डावात १३५ चेंडूत ११९ धावा केल्या होत्या. टीम इंडिया आता जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जिथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. शार्दुल ठाकूर या मालिकेसाठी पूर्णपणे तयार दिसत आहे. टीम इंडियालाही इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू लागणार आहे. अशा परिस्थितीत शार्दुल ठाकूर टीम इंडियाची पहिली पसंती ठरू शकतो.