उत्तेजकप्रतिबंधक धोरण आणि करमुक्तीबाबत चर्चा होणार
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) शिष्टमंडळ सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांची भेट घेणार असून, या वेळी उत्तेजकप्रतिबंधक धोरण आणि भविष्यातील जागतिक स्पर्धासाठी २ कोटी २० लाख डॉलर करमुक्ती हे विषय ऐरणीवर असतील.
त्रिसदस्यीय प्रशासकीय समिती सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी हे ‘बीसीसीआय’चे शिष्टमंडळ मनोहर यांची भेट घेणार आहे. दुबईत नुकत्याच झालेल्या ‘आयसीसी’च्या बैठकीमध्ये भारतामधील उत्तेजकविरोधी अभियानाबाबत जागतिक उत्तेजकविरोधी संस्थेने (वाडा) चिंता प्रकट केली होती. ‘वाडा’च्या तक्रारीमुळे ‘बीसीसीआय’ला राष्ट्रीय उत्तेजकविरोधी संस्थेच्या (नाडा) आधिपत्याखाली यावे लागेल. मात्र आतापर्यंत ‘बीसीसीआय’ ही संघटना ‘नाडा’ला विरोध करीत आली आहे.
दक्षिण आफ्रिकेचे एकदिवसीय मालिकेत निभ्रेळ यश
प्रकाशझोत व्यवस्थेच्या समस्येमुळे पाचव्या एकदिवसीय सामन्याचा निकाल डकवर्थ-लुइस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने लागला. आफ्रिकेने ही लढत ४१ धावांनी जिंकून पाच सामन्यांची मालिका ५-० अशी जिंकली. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २२५ धावा केल्या. त्यानंतर आफ्रिकेला २८ षटकांत २ बाद १३५ धावा केल्या. नाबाद ६७ धावा करणाऱ्या एडीन मार्करामला सामनावीर पुरस्कार देण्यात आला, तर क्विंटन डी कॉकला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.