दक्षिण आफ्रिकेत २००९ मध्ये झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या वेळी विदेश विनिमय नियंत्रण (फेरा) कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल न्यायालयात उपस्थित राहण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांना दिलासा मिळाला आहे.
या प्रकरणी आपल्याला उपस्थित राहण्याबाबत दिलासा मिळावा असा अर्ज मुख्य न्यायाधीश मोहित शहा व न्यायाधीश एम.एस.संकलेचा यांच्या न्यायालयात मनोहर यांनी केला होता. आयपीएल स्पर्धेच्या वेळी फेरा कायद्याचे उल्लंघन झाल्याचा आरोप मनोहर यांच्याविरुद्ध केला होता.
मनोहर यांच्या वतीने बाजू मांडणारे अॅड. राजू सुब्रमण्यम यांनी असे प्रतिपादन केले की, ही स्पर्धा आफ्रिकेत आयोजित करण्याची संकल्पना सर्वस्वी आयपीएलचे तत्कालीन मुख्य ललीतकुमार मोदी यांची होती. भारतात ही स्पर्धा आयोजित करणे शक्य नसल्यामुळे ऐनवेळी ही स्पर्धा आफ्रिकेत घेण्याचा निर्णय त्यांनीच घेतला होता. स्पर्धेकरिता आफ्रिकेत बँक खाते उघडण्याचाही निर्णय त्यांचाच होता. त्यावेळी मनोहर हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असले तरी आयपीएल स्पर्धेबाबतचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार मोदी यांच्याकडेच होते. बँक खाते उघडण्याबाबत, त्यामध्ये पैसे हस्तांतरित करण्याबाबत रिझव्र्ह बँकेची परवानगी घ्यावी असाही सल्ला मनोहर यांनी मोदी यांना दिला होता. मात्र हा सल्ला त्यांनी मानला नाही. त्यामुळे मनोहर यांना याबाबत दोषी धरता येणार नाही.
सुब्रमण्यम यांनी केलेला युक्तिवाद मान्य करीत न्यायालयाने मनोहर यांना उपस्थित राहण्याबाबत दिलासा दिला आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी चार आठवडय़ानंतर घेण्याचा निर्णय दिला.
फेरा कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी मनोहर यांना दिलासा
दक्षिण आफ्रिकेत २००९ मध्ये झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या वेळी विदेश विनिमय नियंत्रण (फेरा) कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल न्यायालयात उपस्थित राहण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांना दिलासा मिळाला आहे.
First published on: 08-08-2013 at 01:51 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shashank manohar get relif from breaking the rule