भारतीय क्रिकेट संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची सध्या तरी आवश्यकता नाही. संघास तीन वेगवेगळे प्रशिक्षक आहेत तसेच मीदेखील काम करीत आहे. आवश्यकता वाटल्यास मी मुख्य प्रशिक्षकाचेही काम करीन, असे भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी येथे सांगितले.
बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या संचालकपदी पुन्हा शास्त्री यांचीच निवड करण्यात आली आहे. दौऱ्यास रवाना होण्यापूर्वी त्यांची येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘संघाचे यापूर्वीचे मुख्य प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांची मुदत संपली आहे. वेगवेगळ्या आघाडय़ांकरिता तीन वेगवेगळे प्रशिक्षक आहेत. तसेच मी पूर्णवेळ संचालक म्हणून काम करीत आहे. असे असताना स्वतंत्ररीत्या मुख्य प्रशिक्षकाची आवश्यकता मला वाटत नाही. बांगलादेशचा दौरा अल्प काळाचा आहे. दौऱ्यावरून मायदेशी परतल्यानंतर मी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर याबाबत चर्चा करणार आहे. कदाचित माझा कालावधी आणखी वाढविला जाण्याची शक्यता आहे.’
बांगलादेश संघास आम्ही कमी लेखत नाही. त्यांच्याकडे अव्वल कामगिरी करण्याची क्षमता आहे. त्यांनी पाकिस्तानविरुद्ध नुकतीच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्हाला सर्वोत्तम कामगिरीच करावी लागणार आहे, असे सांगून शास्त्री म्हणाले, ‘‘ऑफस्पीनर हरभजनसिंग याचे संघात पुनरागमन झाले आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्याचा फायदा आम्हाला या दौऱ्यात होणार आहे.’’
राहुल द्रविडकडे भारतीय युवा संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याबाबत शास्त्री म्हणाले, ‘‘राहुलखेरीज अन्य कोणताही ज्येष्ठ खेळाडू या पदास न्याय देऊ शकणार नाही. त्याच्याइतका अनुभव कोणत्याही खेळाडूकडे नाही. तसेच राजस्थान रॉयल्स संघासही त्याचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याचाही फायदा भारताच्या युवा खेळाडूंना मिळेल.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा