पहिल्या दोन कसोटीत भारतीय संघाच्या खराब कामगिरीमुळे बीसीसीआय नाराज झाल्याची बातमी समोर येते आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर बीसीसीआय विराट कोहली-रवी शास्त्री जोडगोळीची चौकशी करण्याची शक्यता आहे. बर्मिंगहॅम कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघाला लॉर्ड्स कसोटीत डावाने पराभव स्विकाराला लागला. या कसोटीत भारतीय फलंदाजांनीही निराशानजक कामगिरी केली होती.
अवश्य वाचा – तिसऱ्या कसोटीत पराभव टाळण्यासाठी भारतीय संघात ‘हे’ ४ बदल आवश्यक
“इंग्लंड दौऱ्यासाठी आम्हाला तयारीला पुरेसा वेळ मिळाला नाही, ही सबब आता भारतीय खेळाडूंना देता येणार नाही. दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय खेळाडूंनी व्यस्त वेळापत्रक आणि सराव सामन्यांच्या अभावाबद्दल बीसीसीआयकडे तक्रार केली होती. यानंतर खेळाडूंशी चर्चा करुन इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेआधी मर्यादीत षटकांच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं.” नाव न घेण्याच्या अटीवर बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने पीटीआयला माहिती दिली.
“संघातील सिनीअर खेळाडूंच्या मागणीनुसार इंग्लंड दौऱ्यात मर्यादीत षटकांच्या सामन्याचं आयोजन प्रथम करण्यात आलं. याचसोबत कसोटी मालिकेसाठी मदत व्हावी या उद्देशाने भारत अ संघाचा इंग्लंड दौरा आखण्यात आला होता. अजिंक्य रहाणे, मुरली विजय या खेळाडूंना सरावासाठी भारत अ संघात जागा दिली गेली होती. खेळाडूंनी ज्या गोष्टीची मागणी केली त्या सर्व गोष्टी पुरवल्या गेल्या. त्यानंतरही अपेक्षित निकाल लागत नसेल तर बीसीसीआय याबद्दल चौकशी करेल.” बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने संघाच्या खराब कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली.
अवश्य वाचा – चिंता नको, तिसऱ्या कसोटीत मी खेळेन – विराट कोहली
भारतीय संघाला कसोटी मालिकेत मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागल्यास, रवी शास्त्री-विराट कोहली यांना संघनिवडीबद्दल मिळणाऱ्या विशेष अधिकारांमध्येही कपात केली जाण्याची शक्यता आहे. रवी शास्त्रींच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने कसोटी मालिकेत पराभवाचा सामना केला आहे. (२०१४-१५ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-०) (२०१७-१८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १-२) डंकन फ्लेचर भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेत भारताला १-३ असा पराभव स्विकारावा लागला होता. यानंतर बीसीसीआयने डंकन फ्लेचर यांचे सहकारी जो डेविस आणि ट्रेवर पेनी यांना पदावरुन हटवलं होतं. यानंतर रवी शास्त्री यांच्याकडे संघाच्या व्यवस्थापक पदाची जबाबदारी देण्यात आली होती.
रवी शास्त्री यांच्यासोबत सहायक प्रशिक्षक संजय बांगर, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर. श्रीधर यांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. श्रीधर यांनी भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर, भारतीय खेळाडूंच्या स्लिपमध्ये झेल सोडण्याच्या प्रमाणात वाढं झाली आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत ५० झेल सोडले आहेत. त्यामुळे बीसीसीआय आता यावर काय भूमिका घेतंय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अवश्य वाचा – Blog: सावधान अजिंक्य रात्र वैऱ्याची आहे!